तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2016 01:30 AM2016-07-30T01:30:36+5:302016-07-30T01:30:36+5:30

तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते.

When will the street lights at Talodi (B) bus stand start? | तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

तळोधी (बा) बसस्थानकावरील पथदिवे केव्हा सुरू होणार?

Next

जनतेचा सवाल : दोन वर्षांपासून काळोखाचे साम्राज्य
तळोधी (बा) : तळोधी (बा.) ग्रामपंचायतची सदस्य संख्या १७ असल्याने सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून तळोधी (बा) ग्रामपंचायतकडे पाहिले जाते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून तळोधी (बा.) येथील बसस्थानकावरील संपूर्ण ४८ पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळेस बसस्थानकावर पूर्णत: काळोख असतो. पथदिवे केव्हा सुरू करणार, याकडे जनतेने लक्ष वेधले आहे.
तळोधी (बा.) ह्या गावाची लोकसंख्या २० हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या गावाला एका छोट्या शहराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. येथे सर्व सुविधा असल्याने तळोधी (बा) हे शहर तालुक्याच्या उंबरठ्यावर आहे. या गावाचा आजु-बाजूच्या ४२ गावांशी दररोजचा संबध येत असतो. तळोधी (बा.) येथे मोठा बाजार भरतो. त्याला परिसरातील गावांचे नागरिक येत असतात.
या बाजारीकरणाच्या दृष्टिकोनातून लोकांची रेलचेल होत असते. याठिकाणी अनेक शाळा- महाविद्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती, धान्यगंज, पोलीस स्टेशन व अनेक शासकीय कार्यालये आहेत. तळोधी (बा) बसस्थानकावर पाच वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या स्थानिक विकास निधीतून दुभाजक व पथदिवे लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आला. ती कामे पूर्ण करण्यात आली.
त्यावेळी दोन-तीन वर्षे बसस्थानकावर रोषणाई दिसत होती. मात्र गेल्या दीड-दोन वर्षांपासून एक-एक पथदिवे बंद होत गेले. ते पथदिवे बदलण्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष केले.
बसस्थानकापासून काही अंतरावर साई मंदिर व पोलीस ठाणे आहे. या मार्गाने सुसाट वेगाने गाड्या धावत असतात. त्यामुळे अनेकवेळा दुभाजकावरील खांबाला मोठ्या वाहनाने धडक देऊन अपघात झाले. तसेच साई मंदिरासमोरील खांबाला ट्रकने धडक दिली असता ट्रक चालकाकडून नुकसान भरपाई घेण्यात आली. मात्र अजूनपर्यंत खांबावर पथदिवे लावण्यात आले नाही.
या मार्गावर पथदिवे बंद असल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे मार्गावर साप-विंचू मार्गक्रमण करीत असतात. त्यावेळी अनेक साईभक्तांना व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रस्ता पार करावा लागत आहे. तळोधी (बा) ग्रामपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे लोकांना बसस्थानकावर रात्री अंधाराचा सामना करावा लागतो. लोकप्रतिनिधी व वरिष्ठांनी निर्देश देऊन त्वरित पथदिवे सुरू करावे, अशी मागणी तळोधी (बा) येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)

 

Web Title: When will the street lights at Talodi (B) bus stand start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.