गायमुख-पारड्री रस्त्याची दैनावस्था कधी संपणार ? बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 02:47 PM2024-11-07T14:47:40+5:302024-11-07T14:49:19+5:30
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : उखडलेल्या मार्गांवरूनच करावा लागतो प्रवास
राजेश बारसागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील उत्तरेस तळोधीवरून जंगलव्याप्त मार्गात जवळच असलेल्या गायमुख (देवस्थान)-पारडी हा डांबरी मार्ग मागील अनेक वर्षांपासून उखडला असून, या मार्गाचे तीनतेरा वाजले आहेत. डांबरमिश्रित गिट्टी उखडून बाहेर पडली असल्यामुळे वाहनधारकांना या रस्त्याने गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र, बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे अजूनतरी लक्ष गेलेले दिसत नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी पारडी परिसरातील नागरिकांनी केली आहे. पारडी, राजोली, बोंड व त्यापुढे ब्रह्मपुरी येथे जाण्यासाठी गायमुख (देवस्थान)- पारडी हा जंगलव्याप्त मार्ग अगदी जवळचा मार्ग आहे.
हा रस्ता गायमुख देवस्थान परिसरातून गेलेला आहे. या मार्गाने तळोधी (बा.) या केंद्रस्थानी असलेल्या गावातून चंद्रपूर-नागपूर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा अगदी जवळचा सोपा मार्ग आहे. या मार्गावर दिवसभरच वाहतूक सुरू असते. दुचाकी, चारचाकी वाहनांची येथे नेहमीच वर्दळ राहत असते. तसेच या परिसरातील विद्यार्थीसुद्धा मोठ्या प्रमाणात तळोधी येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र, मागील अनेक वर्षांपासून हा डांबरी मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. जागोजागी खड्डे पडून आहेत. कुठे कुठे तर मार्गावरील सर्व डांबर, गिट्टी निघून तिचा मार्गांवरच खच पडून आहे. अशा खडतर मार्गाने नाईलाजाने वाहनधारकांना वाहने चालवावी लागत असल्याचे वाहनधारकांचे म्हणणे आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र मागील अनेक वर्षांपासून येथे दिसून येत आहे. मात्र, बांधकाम विभाग गायमुख देवस्थान- पारडी या अत्यंत सोयीच्या असलेल्या मार्गाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे पारडी परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
हा मार्ग कर्दनकाळ ठरायला नको!
- पारडी-गायमुख (देवस्थान) हा जंगलव्याप्त मार्ग आहे. या मार्गावर जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो.
- रात्री उशिरापर्यंत या मार्गावर नागरिकांची वहिवाट सुरू असते. येथे किरकोळ अपघातही घडले आहेत. पुढे हा मार्ग प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरू नये म्हणजे झाले.
- म्हणून या मार्गाचे डांबरीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष घालावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
"पारडी-गायमुख (देवस्थान) मार्गात देवस्थान असल्याने या मार्गाने वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. शिवाय ब्रह्मपुरीला जाण्यासाठी हा जवळचा मार्ग आहे. आणि तळोधीलाही जाण्यासाठी सोयीचा मार्ग आहे. मात्र, छोट्या-मोठ्या वाहनधारकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. यामुळे ये-जा करण्यासाठी हा मार्ग कसरतीचा आणि कष्टदायक झाला आहे."
- प्रणय बांगरे, रा. बोंड, राजुली