लालनाला प्रकल्पाचे पाणी केव्हा मिळणार ?

By admin | Published: June 11, 2016 12:51 AM2016-06-11T00:51:48+5:302016-06-11T00:51:48+5:30

चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी नसल्याने नेहमी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी बसतो.

When will the water of the project get flooding? | लालनाला प्रकल्पाचे पाणी केव्हा मिळणार ?

लालनाला प्रकल्पाचे पाणी केव्हा मिळणार ?

Next

लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष : शेतकरी सिंचनापासून वंचित
खडसंगी : चिमूर तालुक्यात शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सोयी नसल्याने नेहमी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका नेहमी बसतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी कर्जबाजारी व आर्थिक संकटात जगत आहे. या परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी चिमूरचे आमदार तथा माजी राज्यमंत्री विजय वडेट्टीवार यांनी जलसंपदा मंत्री असताना महत्त्वाकांक्षी निर्णय घेत, सिंचन विभागाकडे पाठपुरावा करीत वर्धा जिल्ह्यातील लाल नाला प्रकल्पातील पाणी आणण्याची योजना आणली. या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून अजूनही लाल नाला उपसा सिंचन प्रकल्पााचे पाणी केव्हा मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका अशी ओळख असलेल्या चिमूर तालुक्यात २६३ गावांचा समावेश आहे. या तालुक्यात प्रामुख्याने धान, कापूस, सोयाबिन पिकासह अन्य पिकांचे उत्पादन होते. तालुक्यात कोणतेही धरण नसल्याने येथील शेतकरी निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून असतात. तालुक्यात पिकाखालील क्षेत्र ६१९७२.६६ हेक्टर तर पडित क्षेत्र ५७७२.६८ हेक्टर आहे. लाल नाला प्रकल्प हा वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावाजवळील नाल्यावर बांधलेला मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या एकूण ७२९० हेक्टर सिंचन क्षेत्रापैकी ३३०८ हेक्टर कोळसा खाणी अंतर्गत येते. त्यामुळे हे क्षेत्र प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातून वंचित होत आहे. ३९८२ हेक्टर सिंचन क्षेत्रावर (वरोरा व हिंगणघाट तालुक्यातील कामे झाली आहेत) हे कमी होत असलेले क्षेत्र भरुन काढण्यासाठी लाल नाला प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातून सिंचन योजनेद्वारे चिमूर तालुक्यातील १२ गावातील एकूण ३३०८ हेक्टर क्षेत्रास लाभ होणार आहे.
योजनेच्या पंपगृहामध्ये ३६० अश्वशक्तीचे ४ पंप प्रस्तावित आहेत. १२०० मि.मी व्यासाच्या व ५८०० मीटर लांबीच्या लोखंडी उर्ध्वनलिकेद्वारे (पाईप) आमडी बेगडे गावाजवळील वितरण कुंडामध्ये पाणी सोडण्यात येईल. या पंपाद्वारे उचललेले पाणी कालव्याद्वारे ३३०८ हेक्टर क्षेत्राला सिंचन करण्याचे प्रस्तावित असून या सिंचनाचा लाभ चिमूर तालुक्यातील १२ गावातील आमडी बेगडे, चिचघाट, चकचिचघाट, रेंंगाबोडी, भिवकुंड, वहानगाव, मुरपार रिठ, खुर्सापार, खापरी, बोथली, खानगाव, सावरी या गावातील ३००८ हेक्टर क्षेत्रात होणार आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून लाल नाला उपसा सिंचन प्रकल्प या महत्वाकांक्षी योजनेचे काम आमडी बेगडे या गावाजवळ येऊन थांबले आहे. त्यामुळे लाल नाला उपसा सिंचन प्रकल्प केव्हा पूर्ण होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. राज्यात सत्ता परिवर्तन होवून नव्यानेच विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमाान झाले. चिमूर विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून किर्तीकुमार भांगडिया निवडून आले. त्यामुळे विधानसभा क्षेत्राचे आमदार भांगडिया यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रकल्पाकडे लक्ष देवून कासवगतीने सुरू असलेले लाल नाला सिंचन योजनेचे काम युद्धस्तरावर पुर्ण करून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याची माागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: When will the water of the project get flooding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.