भाजीसाठी डाळ आणायची कुठून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:30 AM2021-02-11T04:30:29+5:302021-02-11T04:30:29+5:30
बल्लारपूर : तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे, जून व नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, चणाडाळ स्वस्त धान्य दुकानातून ...
बल्लारपूर : तालुक्यात लॉकडाऊनच्या काळात एप्रिल, मे, जून व नंतर सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तूरडाळ, चणाडाळ स्वस्त धान्य दुकानातून वितरित करण्यात आली, परंतु मागील तीन महिन्यांपासून तूरडाळ, चणाडाळ गायब झाली आहे. रेशन दुकानातून मिळणाऱ्या गहू तांदळासोबत फक्त साखर खायची काय, असा सवाल लाभार्थी स्वस्त धान्य दुकानदारांकडे करीत आहे.
शासनाकडून रेशन दुकानदारांना अन्न-धान्याचा पुरवठा केला जातो. त्यामध्ये गहू, तांदूळ, तेल, साखर, तसेच डाळ या अन्न-धान्याचा समावेश असताे, परंतु मागील तीन महिन्यांपासून स्वस्त धान्य दुकानात फक्त गहू, तांदूळ व साखर मिळत आहे. मोफत मिळणारे धान्यही बंद झाले आहे. रेशन दुकानाच्या भरवशावर आपली उपजीविका करणाऱ्या ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. जेवणात भाजी कोठून आणायची, अशा तक्रारी सर्वच लाभार्थी करीत आहेत.
बल्लारपूर तालुक्यात ६६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. स्वस्त दुकानातून धान्याची उचल करणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या ३१ हजार १२३ इतकी आहेत. यामध्ये प्राधान्य कुटुंबातील १४ हजार ४९८, तर ७ हजार ४५४ पिवळे कार्ड धारक, अंतोदयचे ७ हजार ३०७ व एक हजार ८६४ केशरी शिधापत्रिकाधारक आहेत. काही शिधापत्रिकाधारक अजूनही कोरोना संकटातून निघाले नाही. रोजगाराच्या शोधात आहेत. हातावर पोट असणाऱ्या लाभार्थ्यांची तूरडाळ मिळत नसल्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. शिवाजी वॉर्डातील एका रेशन दुकानदाराने सांगितले की, आम्हाला सतत लाभार्थ्यांकडून तूरडाळीची मागणी होत आहे, परंतु आम्ही काहीच करू शकत नाही.
कोट
शासनाच्या आदेशाने ज्या अन्नधान्याचा पुरवठा होतो, त्याप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदार लाभार्थ्यांना धान्य देतो. तूरडाळ सध्या बंद आहे.
- संजय राईंचवार, तहसीलदार, बल्लारपूर