कोरोना नसलेल्या अत्यवस्थ रुग्णांनी जायचे तरी कोठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:28 AM2021-04-22T04:28:58+5:302021-04-22T04:28:58+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांनी फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मेडिलक ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णांनी फुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने मेडिलक कॉलेजमध्ये एक महिला कोविड रुग्णालय सुरु केले आहे. तसेच शहरातील नामांकित २४ रुग्णालयात कोविड सेंटर सुरु केले आहे. परंतु, दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने या रुग्णालयात पाय ठेवण्यासाठी जागा नाही. साधा बेड, ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेंटिलेटर मिळणविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु, यामध्ये कोरोना नसलेल्या व इतर व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांची मोठी पंचाईत होत आहे. प्रत्येक रुग्णांची कोरोना अहवाल निगेटिव्ह असल्याशिवाय रुग्णालयात प्रवेशच नसल्याने त्यांना वेळीच उपचार मिळणे कठीण झाले आहे. तर कोविड सेंटरमधील डॉक्टरांना इतर रुग्ण पाहण्यास वेळच नसल्याने इतर अत्यवस्थ रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे.
बॉक्स
रुग्णांची गैरसोय
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात चंद्रपूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. परंतु, आता साधा तापाचाही रुग्ण असल्यास त्याला कोरोना असल्याचे समजून वेगळी वागणूक दिली जाते. जोपर्यंत अहवाल निगेटिव्ह नसतो. तोपर्यंत खासगी डॉक्टर हातच लावत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.
बॉक्स
२४ खासगी रुग्णालयात कोविडचे उपचार
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांनी फुल्ल झाले असल्याने प्रशासनाने शहरातील क्राइस्ट हॉस्पिटल, पंत हॉस्पिटल, बुक्कावार हॉस्पिटल, श्वेता हॉस्पिटल, आस्था हॉस्पिटल, शिवजी हॉस्पिटल, मानवटकर हॉस्पिटल, पोद्दार हॉस्पिटल, डॉ. टिकले हॉस्पिटल, शिशु हॉस्पिटल, राजीव रतन, सर्वोदय, शिंदे मल्टी हॉस्पिटल, यशलोक, गुरुकृपा, नगराळे, बुक्कावार, गुलवाडे, शिवजी, स्पदंन असे एकूण येथे कोविड सेंटर सुरु केले आहे. येथे रुग्णांची संख्याही प्रचंड आहे. त्यामुळे येथील डॉक्टर कोविड रुग्णांवरच उपचार करतात. येथील ऑक्सिजन बेड, व्हेटिलेटर कोविड रुग्णांसाठी वापरण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर भेटणे कठीण जात आहे. यासोबतच या रुग्णालयात कोविडचे रुग्ण असल्याने सर्वसामान्य रुग्ण येथे जाण्यास धजावत नसल्याचेही दिसून येत आहे.
बॉक्स
अनेक रुग्ण जातात परत
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय तसेच खासगी रुग्णालयात कोविड रुग्णांचाच अधिक भरणा आहे. येथे डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. जे काही डॉक्टर आहेत. ते याच रुग्णांकडे लक्ष देत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण रुग्णांचा वाली कुणीच नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना परत जावे लागते. सर्वसाधारण रुग्णांचाही उपचाराअभावी मृत्यू होत आहे. परंतु, कोरोनाच्या मृतांच्या मोठ्या आकडेवारीमध्ये याकडे दुर्लक्ष होत आहे.
बॉक़्स
कोविडवर उपचार सुरु असलेली खासगी रुग्णालये ८
शहरातील शासकीय रुग्णालये १
शहरातील एकूण खासगी रुग्णालये ६५
शासकीय कोविड हॉस्पिटल ३