तर टोलविरोधात आंदोलन उभारणार
By admin | Published: January 13, 2015 10:57 PM2015-01-13T22:57:40+5:302015-01-13T22:57:40+5:30
पथकरासंदर्भात असलेल्या नियमांना पायदळी तुडवून नागपूर-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड कंपनी टोल वसुली करीत आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास नंदोरी, भटाळी व टोल
गावकऱ्यांचा इशारा : दिशाभूल सहन करणार नाही
चंद्रपूर : पथकरासंदर्भात असलेल्या नियमांना पायदळी तुडवून नागपूर-चंद्रपूर-बल्लारपूर टोल रोड लिमिटेड कंपनी टोल वसुली करीत आहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास नंदोरी, भटाळी व टोल नाक्याच्या पाच किलोमीटर परिसरातील गावकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या परिसरातील गावकऱ्यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिला.
२६ डिसेंबरपासून नंदोरी येथील पथकर नाका सुरू झाला आहे. या नाक्यावर नंदोरी, भटाळी, बोर्डा या परिसरातील वाहनांना सुट मिळण्याच्या मागणीवरून पहिल्या दिवसापासूनच संघर्ष सुरू आहे. गेल्या आठवड्यात टोल नाक्याचे अधिकारी आणि गावकऱ्यांमध्ये बैठक झाली होती. त्यात आठवडाभरात निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र आठवडा उलटूनही निर्णय न झाल्याने गावकरी संतापले आहे. या संदर्भात बोलताना भटाळीचे सरपंच सुधाकर रोहणकर म्हणाले, स्थानिक वाहनासाठी सुट देण्याची तरतुद अन्यत्र असली तरी येथे मात्र चालढकल सुरू आहे. ४५ किलोमीटरच्या अंतरात टोल नाका नसावा असा नियम असला तरी ताडाळी ते नंदोरी या दोन्ही ठिकाणच्या टोल नाक्यातील अंतर फक्त ३० किलोमीटर आहे. ताडाळी ते विसापूर या दोन नाक्यातील अंतर १८ किलोमीटर आहे. परिसरात ७० वाहने आहेत. नंदोरी ग्रामपंचायतीने यापूर्वी ठरावही दिला आहे. नाक्यावर स्थानिकांना रोजगारातून डावलून बाहेरील युवकांना रोजगार देण्यात आला आहे. टोल नाक्यावरून बैलगाडी नेण्यासाठी जागाच नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या बाबी तातडीने विचारात न घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला किशोर उमरे, रामदास विरूटकर, प्रशांत डाहुले, भाऊराव दंडारे, संजय बुराण, बालाजी चौधरी आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)