पांढऱ्या सोन्याला व्यापारपेठेचे ग्रहण
By admin | Published: November 22, 2014 10:57 PM2014-11-22T22:57:51+5:302014-11-22T22:57:51+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस
प्रशासनाचे शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष : शासनाचे संकलन केंद्र गेले कुठे ?
राजकुमार चुनारकर - खडसंगी
चंद्रपूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून कापसाची लागवड केली. मात्र मात्र कापसाला व्यापारपेठच मिळत नसल्याने कापूस उत्पादक विवंचनेत सापडला आहे. शासनाचे कापूस संकलन केंद्र जिल्ह्यात कुठेही सुरू झालेले नाही. खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावाने कापूस विकावा लागत असल्याने विवंचनेत असलेला कापूस उत्पादक आर्थिक संकटातही सापडला आहे. धान उत्पादक तालुका म्हणून ओळख असलेल्या चिमूर तालुक्यात काही वर्षांपूर्वी कापसाची लागवड झाली. चिमूर तालुक्यात अनेक वर्षांपासून कापसाचे चांगले उत्पादन होत आहे. मात्र कापसावर आधारीत एकही उद्योग नसल्याने तालुक्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे तर उत्पादन असूनही कापूस संकलन केंद्र नसल्याने येथील शेतकरीही अडचणीत आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात लाखाहून अधिक हेक्टरवर कापसाची लागवड केली जाते. यावर्षीही कापसाची बऱ्यापैकी लागवड झाली. आता कापूस शेतकऱ्यांच्या हाती येऊ लागला आहे. मात्र शासनाचे शेतकऱ्यांकडे लक्षच नसल्याचे दिसून येते. अद्याप जिल्ह्यात कुठेही शासकीय कापूस संकलन केंद्र सुरू झालेले नाही.
उद्योग विरहीत तालुका म्हणून ओळख असलेल्या चिमूर तालुक्यातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. त्यामध्ये मागील वर्षात ६१९७२.६६ हेक्टर आर जमीन पिकाखाली आहे.त्यामुळे तालुक्यातील सर्व अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यालगतच्या सिंदेवाही, नवरगाव, नेरी, शंकरपूर, खांबाडा या गावात मुख्य धानाचे पीक घेण्यात येते. मात्र मागील काही वर्षांपासून सिंचनाच्या सोयीअभावी धान उत्पादनावर परिणाम झाला. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कल कापूस व सोयाबीन पिकाकडे वळला. मात्र मागील दोन वर्षांपासून निसर्गाने दगा दिल्याने शेतकरी सोयाबीन पिकापासून वंचित राहिला. परिणामी शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पसंती दिली.
आजघडीला चिमूर तालुक्यातील मासळ, पिपर्डा, शंकरपूर, भिसी, साठगाव, वाकर्ला, कोलारी, खडसंगी, आमडी, बोथली, चारगाव, रेंगाबोडी या भागात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली. मात्र कापसाचे उत्पादन चांगल्या प्रमाणात येत असतानाही तालुक्यात एकही कापूस विक्री संकलन केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्रीला हिंगणघाट, वरोरा येथील खासगी व्यापाऱ्याकडे विकावा लागतो. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करुन कमी दरात कापसाची खरेदी करण्यात येत आहे. शेतकरी व्यापाऱ्याकडूनही नाडवला जात आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नाला आपणच वाचा फोडू, असे आश्वासन निवडणूक प्रचारादरम्यान अनेक पुढाऱ्याकडून देण्यात आले. मात्र आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ या शेतकऱ्याचा आपण वाली म्हणणाऱ्या पुढाऱ्यावर आली आहे. शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या सोडवून शेतकरी कसा सुखी होईल. याकरिता नव्या सरकारकडून नियोजन होणे गरजेचे झाले आहे.