घोडाझरी अभयारण्य येथील नाईट सफारीला वन्यप्रेमींचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:01 PM2019-01-20T23:01:28+5:302019-01-20T23:01:46+5:30
नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : नव्यानेच निर्माण झालेल्या घोडाझरी अभयारण्यात नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येणार आहे. याला ब्रह्मपुरी वनविभाग अंतर्गत काम करणाऱ्या वन्यजीवप्रेमी व संस्थांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. या संदर्भात सभा घेऊन ब्रह्मपुरी वनविभागाला निवेदन दिले आहे.
घोडाझरी अभयारण्यात प्रजासत्ताक दिनी नाईट जंगल सफारी सुरु करण्यात येत असल्याची माहिती वन्यजीवप्रेमींना मिळाली. ही नाईट सफारी वन्यजीव व मानव वन्यजीव संघर्षाला कारणीभूत ठरेल, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे. आधीच ब्रह्मपुरी वनविभागात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोह्चला आहे. यातच वनविभाग सफारी सुरु करू, असा विचार करीत आहे. यामुळे वन्यजिवाच्या अधिवासावर विपरित परिणाम होत आहे. त्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊन त्यांचे भ्रमण मार्ग खंडित होणार आहे. निशाचर वन्यजिवांचे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे. वन्यजिवांना शांत वातावरण न मिळाल्यास ते गावाकडे येतील आणि त्यातून मानवावर हल्ले वाढण्याचे प्रमाण वाढेल. नाईट सफारी सुरु केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे आजीवन प्रचारक सूर्यभान खोब्रागडे, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर, तरुण पर्यावरण मंडळाचे अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, जगदीश पेंदाम, झेप निसर्ग सरंक्षण संस्थेचे पवन नागरे, अमित देशमुख, अमोल वानखेडे, डॉ. मेश्राम, पर्यावरण सवर्धन समितीचे कवडु लोहकरे, अवार्ड संस्थेचे गुणवंत वैद्य, सहजीवन संस्थेचे प्रकाश पोतराजे, यशवंत कायरकर उपस्थित होते.