आमच्या समस्या कोण सोडविणार? पालिकेत गेला चक्क श्वान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:19 AM2021-06-23T04:19:10+5:302021-06-23T04:19:10+5:30
आशिष देरकर कोरपना : गडचांदूर शहरात अनेक समस्या आवासून उभ्या आहे. रोज आपापल्यापरीने नागरिक समस्या सोडवून घेण्यासाठी नगरपालिकेत जाऊन ...
आशिष देरकर
कोरपना : गडचांदूर शहरात अनेक समस्या आवासून उभ्या आहे. रोज आपापल्यापरीने नागरिक समस्या सोडवून घेण्यासाठी नगरपालिकेत जाऊन पाठपुरावा करतात. अशातच सोमवारी सायंकाळी एक श्वान थेट गडचांदूर येथील नगर पालिकेत शिरला. तो काहीवेळ तिथे उभा राहून येथील कर्मचाऱ्यांकडे मोठ्या आशेने पाहत होता. हा श्वान आपल्या समस्या घेऊन तर आला नाही ना, असा सूर यानंतर उमटू लागला. माणसांच्याच समस्या सुटत नाहीत तर मग या मुक्या प्राण्यांच्या समस्यांचे काय? असा सवालही काहीजण व्यक्त करीत हाेते. या कुत्र्याची शहराची चांगलीच चर्चा रंगली.
मंगळवारी चक्क श्वान आपल्या गडचांदूर नगरपरिषदेत पोहचला. तो येताच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. ज्याप्रमाणे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष किंवा इतर पदाधिकारी नसल्यामुळे तुम्ही नंतर या असे सामान्य नागरिकांना सांगण्यात येते. तसेच या श्वानालासुद्धा असेच काही सांगून हाकलून लावण्याचा प्रयत्न यावेळी झाला.
गडचांदुरात नागरिकांसोबतच जनावरांच्यासुद्धा फार समस्या आहेत. त्यात मुख्य महामार्गावरील मोकाट गुरे, शहरातील डुकरांची वाढती संख्या व त्यामुळे निर्माण होणारी घाण, विध्वंसक मोकाट कुत्र्यांचा हैदोस इत्यादी समस्यांचा समावेश होतो. नागरिक या समस्या नगरपरिषदेकडे मांडत असतात. कदाचित हा श्वान साऱ्या मुक्या प्राण्यांचे प्रतिनिधित्व कर करायला पालिकेता आला नसेल ना, अशी चर्चा शहरात चवीने होत आहे.