चंद्रपूर मनपाच्या एक सदस्यीय वॉर्ड रचनेत कोण बाजी मारणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 05:00 AM2021-08-29T05:00:00+5:302021-08-29T05:00:49+5:30
चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच भूमिपूजन कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी चंद्रपूर शहर कार्यकारिणी गठित करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविल्या. आम आदमी पक्षानेही शहरातील सर्वच प्रभागांत प्रचाराच्या भिंती रंगविल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगरपालिकेतील बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणाली रद्द करून आगामी निवडणुकीसाठी एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा सादर करण्याचा आदेश धडकताच चंद्रपूर मनपा प्रशासन शुक्रवारपासून कामाला लागले. यापूर्वीच्या वॉर्डरचनेत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. परिणामी, एक सदस्यीय वॉर्डरचनेत कोणता पक्ष बाजी मारणार, या चर्चेला मनपाच्या राजकीय वर्तुळात तोंड फुटले आहे.
चंद्रपूरसह राज्यातील काही महानगरपालिकांची मुदत फेब्रुवारी २०२२ रोजी संपणार आहे. सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेना, बसपा, तसेच अन्य आघाड्यांनी आतापासूनच चंद्रपुरात बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. राजकीय गणित लक्षात ठेवूनच भूमिपूजन कार्यक्रमांचा सपाटा सुरू झाला आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी चंद्रपूर शहर कार्यकारिणी गठित करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या सोपविल्या. आम आदमी पक्षानेही शहरातील सर्वच प्रभागांत प्रचाराच्या भिंती रंगविल्या. मुदत संपणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला अवघे सहा महिने शिल्लक आहेत. राज्यात भाजप सत्तेत असताना बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणालीचा मोठा लाभ झाला. आता राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा अधिनियमअंतर्गत राज्यातील सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला.
त्यानुसारच, निवडणूक आयोगाने बहुसदस्यीय वॉर्डरचना प्रणाली रद्द करून आगामी निवडणूक एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीचा कच्चा आराखडा सादर करण्याचा आदेश जारी केला आहे.
...असे असतील एकसदस्यीय वॉर्डरचनेचे निकष
चंद्रपुरातील नवीन प्रभागरचनेसाठी २०११ मध्ये झालेल्या लोकसंख्येलाच ग्राह्य धरण्यात येईल. यापूर्वीच्या हद्दीत झालेले बदल, विकासकामे आणि योजनांमुळे झालेला भौगोलिक बदल, नवीन रस्ते, सार्वजनिक इमारती, पूल आदींचाही विचार केला जाणार आहे. याशिवाय, निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून चंद्रपुरातील नवीन प्रभागांचा कच्चा आराखडा तयार केला जाणार आहे.
निवडणूक आयोगाचा आदेश मिळताच शुक्रवारपासून एकसदस्यीय वॉर्डरचना आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला काही दिवसांचा कालावधी लागेल. आराखडा तयार झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल.
- राजेश मोहिते, आयुक्त मनपा, चंद्रपूर
बहुसदस्यीय वाॅर्ड रचना रद्द झाल्याने भाजप व काँग्रेसचे दावे-प्रतिदावे
कोटमनपाच्या बहुसदस्यीय वॉर्डरचनेतून विकासात अडचणी येतात. समन्वयाचाही अभाव असतो. ही त्रुटी एकसदस्यीय वॉर्ड पद्धतीमुळे दूर होईल. राज्य शासनाचा निर्णय योग्यच आहे. या निर्णयामुळे विकासाला चालना मिळेल.
- रामू तिवारी, जिल्हाध्यक्ष शहर काँग्रेस, चंद्रपूर
बहुसदस्यीय वॉर्डरचनेतून एकापेक्षा अधिक व्यक्तिंना नेतृत्व करण्याची संधी मिळते. मात्र, एकसदस्यीय वॉर्ड रचनेतून हे शक्यच नाही. राज्य सरकारच्या निर्णयामुळे सक्षम उमेदवारालाही प्रतिधित्वापासून वंचित राहावे लागेल. हा निर्णय अन्यायकारकच आहे.
- डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष, महानगर भाजप, चंद्रपूर