बापरे... अख्खे कुटुंबच विकत होते ब्राऊन शुगर; आई-वडील अटकेत, मुलगा फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2022 12:14 PM2022-11-02T12:14:21+5:302022-11-02T12:17:28+5:30
३८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त
चंद्रपूर : ब्राऊन शुगरची विक्री करताना चंद्रपूरच्या बाबूपेठ परिसरातून एका कुटुंबाला अटक केली आहे. या कारवाईत ३८ ग्रॅम ब्राऊन शुगर (किंमत १ लाख २० हजार रुपये) आढळून आले. ही कारवाई चंद्रपूर शहर पोलिसांनी मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास केली. या प्रकरणात श्याम दुपारे (६०), त्याची पत्नी रेखा दुपारे (५५) यांना अटक केली, तर मुलगा अजय दुपारे हा कारवाईच्या वेळी पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बाबूपेठ परिसरातील एका घरी ब्राऊन शुगरची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अजय दुपारे याच्या घरी धाड टाकली. चक्क कुटुंबच ब्राऊन शुगरची विक्री करीत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
ठाण्याच्या शोध पथकाचे जयप्रकाश निर्मल यांनी सापळा रचून अजय दुपारे याच्या बाबूपेठ रेल्वे क्राॅसिंग मार्गावर पुलाच्या परिसरातील घरी सहकाऱ्यांना घेऊन धाड घातली. यावेळी अजय दुपारे हा घरात नव्हता. त्याची आई रेखा दुपारे यांच्या कमरेला असलेल्या पोतडीची तपासणी केली असता त्यात ब्राऊन शुगरच्या ४३ पुड्या आढळून आल्या. त्यात १९ ग्रॅम ब्राऊन शुगर आढळले. घरात अन्यत्र तेवढेच ब्राऊन शुगर आढळल्याने दुपारे पती-पत्नीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली, तर त्यांचा मुलगा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांच्या नेतृत्वात एपीआय जयप्रकाश निर्मल, डीबी पथकाचे विलास निकोडे, जयंता चुनारकर, चेतन गजर्लावार, इम्रान खान, दिलीप, इर्शाद, रूपेश रणदिवे, सचिन बोरकर आदींनी केली.
नवे पोलीस अधीक्षक ब्राऊन शुगर शुगरचे रॅकेट शोधणार?
अजय दुपारे ऊर्फ गुड्डू हा बाहेरून ब्राऊन शुगर आणायचा. त्याच्या छोट्या-छोट्या पुड्या करून त्याच्या आई-वडिलांना विक्री करायला लावायचा असे पोलीस तपासात समोर आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगरची विक्री होत होती. अनेक शाळकरी मुले याच्या आहारी गेली असल्याने पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तो नेमका कुठून माल आणायचा? चंद्रपुरात अनेक भागांत अमली पदार्थ मिळत असल्याची ओरड आहे. नुकतेच चंद्रपूरला नवे पोलीस अधीक्षक मिळाले आहे. ते या रॅकेटचा पर्दाफाश करतील, अशी चंद्रपूरकरांना आशा आहे.