२४६० शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून विमा कंपनीने का केले अपात्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:02 PM2024-07-30T16:02:16+5:302024-07-30T16:03:17+5:30
बल्लारपूर तालुक्यातील प्रकार : शेतकरी विम्यापासून वंचित
आशिष खाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पळसगाव: प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये बल्लारपूर तालुक्यातील ६७५४ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीकविमा काढला. मात्र, त्यात फक्त पीक नुकसानीचा २८५६ शेतकऱ्यांना पीकविमा प्राप्त झाला. २४६० विमा काढलेले शेतकरी पात्र असूनदेखील त्यांना विमा कंपनीने विविध कारणे दाखवून अपात्र केल्याचा प्रकार बल्लारपूर तालुक्यात उघडकीस आला आहे.
बल्लारपूर तालुक्यातील १७ गावांमधील ६७५४ शेतकऱ्यांनी एका रुपयात पीकविमा काढला. २०२३ मध्ये ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यात कापूस, सोयाबीन, तूर, धान, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ना झाले होते. शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या नियमानुसार ७२ तासांच्या आत क्लेम केली. त्यापैकी नुकसानभरपाई म्हणून २८५६ शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे खात्यावर जमा करण्यात आले. तर २४६० कापूस, धान उत्पादक पात्र शेतकऱ्यांना विमा कंपनीने आपले स्वतःची विविध कारणे उपस्थित करून त्या सर्व शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र करण्यात आलेले आहेत.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान अतोनात होऊनदेखील विमा कंपनीच्या मनमर्जी कारभारामुळे त्या २४६० शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून. पीकविमा कंपनीचे तांत्रिक प्रॉब्लेम, वेळेवर शेतावर पंचनामा करण्यासाठी न येणे, अचूक करणे दाखवणे, टोल फ्री नंबरवर तक्रार न घेणे, या कारणांमुळे त्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे विमा कंपनीने अपात्र केल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे.
शासनाने मोठा गाजावाजा करून शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना आणली खरी; मात्र ती शेतकऱ्यांसाठी मृगजळ ठरली आहे. आता शेतकऱ्यांना विमा काढून पीक नुकसानीपोटी पात्र असून देखील अपात्र करण्याचा सपाटा विमा कंपनी केला असल्याने या शेतकऱ्यांकडे थेट कृषिमंत्र्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन विमा कंपनीचे कान टोचण्याची गरज आहे.
पालकमंत्र्यांनी बैठक घेण्याची गरज
बल्लारपूर तालुक्यातील २४६० शेतकरी विमा लाभ मिळण्यासाठी पात्र असून देखील विमा कंपनीने त्या शेतकऱ्यांना विविध मनमर्जीने कारणे दाखवून अपात्र केले. त्यामुळे संकटकाळात शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी राहणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित अधिकारी व विमा प्रतिनिधी यांची बैठक घेऊन बल्लारपूर तालुक्यातील अपात्र केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा व यानंतर समोर नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे क्लेम विमा प्रतिनिधी अपात्र करणार नाही, अशी पारदर्शकता आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा विमा अधिकारी यांना शेतकऱ्यांनी फोन केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप देखील शेतकरी करत आहे.
"शेतकऱ्यांना विमा कंपनीने किरकोळ कारणे देत विमा नाकारला आहे; परंतु व्यवहारिकदृष्ट्या विचार केला तर हे शेतकरी नुकसान भरपाईस पात्र आहे."
- श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, बल्लारपूर