युक्रेनमध्ये डॉक्टर होण्यासाठी का जातात विद्यार्थी? परतलेल्यांनी सांगितले तिकडचे 'हे' वैशिष्ट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2022 07:10 AM2022-03-06T07:10:00+5:302022-03-06T07:10:02+5:30
Chandrapur News युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी एमबीबीएस शिकण्यासाठी जातात, याचं प्रमुख कारण म्हणजे शुल्क. तेथील खासगी कॉलेजची एमबीबीएसची फी भारताच्या तुलनेत अत्यंत कमी आहे.
राजकुमार चुनारकर
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील चिचाळा गावातला हर्षल ठवरे, शंकरपूर येथील ऐश्वर्या खोब्रागडे सध्या युक्रेनमध्ये एबीबीएसचे शिक्षण घेत आहेत. रशिया - युक्रेन युद्धाच्या बातम्यांनी सध्या ठवरे, खोब्रागडे कुटुंबात प्रचंड चिंतेचे वातावरण होते. २४ फेब्रुवारी रोजी दोन्ही देशांतील तणाव अधिकच विकोपाला गेला आणि प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाल्याच्या बातमीने व सलग दहा दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धाने ऐश्वर्याचे पालक व्याकूळ झाले होते. मात्र चिमूर तालुक्यातील सर्वच विद्यार्थी मूळगावी पोहोचले आहे.
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी एमबीबीएस शिकण्यासाठी जातात, याचं प्रमुख कारण म्हणजे शुल्क. तेथील खासगी कॉलेजची एमबीबीएसची फी भारताच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. भारतात एखाद्या खासगी कॉलेजमध्ये एमबीबीएस करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंत खर्च येतो. अमेरिकेत आठ कोटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडातदेखील हा खर्च चार कोटी रुपयांपर्यंत जातो. मात्र युक्रेनमध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये एमबीबीएसचा अभ्यासक्रम २५ लाख रुपयांमध्ये पूर्ण करता येतो. त्यामुळे आपल्या देशातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये डॉक्टरकीचे शिक्षण घेण्यासाठी जातात, असे युक्रेनवरून परत आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
एमबीबीएसच्या जागांचा तुटवडा
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी एमबीबीएसला जाण्यामागील आणखी एक मोठे कारण म्हणजे भारतातील एमबीबीएसच्या जागांचा तुटवडा. भारतात अजूनही दरवर्षी फक्त ८८ हजार एमबीबीएसच्या जागा उपलब्ध आहेत. दरवर्षी जवळपास आठ लाखांहून अधिक विद्यार्थी दोन वर्षांच्या अखंड मेहनतीनंतर डॉक्टरकीची प्रवेशपरीक्षा देतात. त्यापैकी ८८ हजारांनाच एमबीबीएसचे शिक्षण घेण्याची संधी मिळते. म्हणजेच सात लाख विद्यार्थ्यांचे स्वप्न अर्धवट राहते. यापैकीच काही मुलं मग युक्रेनसारख्या देशाची वाट धरतात.