पतीच्या काठीहल्ल्यामुळे पत्नी वाघाच्या तावडीतून सुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2021 01:37 PM2021-01-29T13:37:47+5:302021-01-29T13:38:08+5:30
Chandrapur News कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला चढविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोठारी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रातील हरणपायली बीट क्र. ५४१ लगत असलेल्या शेतात तूर पिकाचे रक्षण तथा जागल करण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला चढविला. काही अंतरावरच असलेल्या तिच्या पतीने वाघाच्या दिशेने पूर्ण ताकदीनिशी काठी भिरकावली. काठी बसताच वाघ पतीच्या मागे लागला. मात्र समयसूचकता दाखवत पती झाडावर चढला व आरडाओरड सुरू केली. त्यामुळे वाघ जंगलाच्या दिशेने पळाला.
ही थरारक घटना बुधवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान घडली. कोठारी परिसरातील स्थानिक वनक्षेत्रात येणाऱ्या हरणपायली बीटातील नियत क्षेत्रालगत असलेल्या भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर तूर पिकाच्या राखणीसाठी कोठारी येथील करणकुमार कन्नाके व त्यांच्या पत्नी लीला करणकुमार कन्नाके सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान शेतात गेले होते. रात्री १० वाजताच्या दरम्यान लीला कन्नाके या झोपडीपासून काही अंतरावर गेल्या असता शेतालगतच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.
आधीच सावध असलेल्या महिलेने किंचाळण्यास सुरुवात केली. त्या आवाजाच्या दिशेने पती करणकुमार यांनी धाव घेतली. पत्नीच्या जवळ वाघ दिसताच त्याने जवळ असलेली काठी वाघाच्या दिशेने ताकदीने भिरकाविली आणि वाघावर काठीचा प्रहार होताच वाघ करणकुमारवर हल्ला करण्यासाठी धावला. त्याच वेळी करणकुमार झाडावर चढला व मोठ्याने आरडाओरड करू लागला. यामुळे वाघ जंगलात पसार झाला.
यात लीला कन्नाके या जखमी झाल्या असून, त्यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती तात्काळ कोठारी वनाधिकारी यांना देण्यात आली. पतीच्या समयसूचकतेमुळे पत्नीचे प्राण वाचले. या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यात भीतीचे सावट पसरले आहे.