वन्यप्राण्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांची शेतात जागली
By admin | Published: November 16, 2014 10:48 PM2014-11-16T22:48:56+5:302014-11-16T22:48:56+5:30
शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही
राजुरा : शेतकऱ्यांना यावर्षी अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लष्करी अळी, कोरडा दुष्काळ यासारख्या अडचणींतून सावरत नाही तोच वन्यप्राणी शेतपिकाची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीलाही शेतात जागली जावे लागत असल्याचे चित्र परिसरात दिसून आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षीच कोणत्या ना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागत असते. यावर्षीच्या हंगामात आधी लष्करी अळीने पिकांवर हल्ला चढविला. त्यानंतर गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. यातून वाचलेले पीक वाचविण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. शेतात कापणी करून ठेवलेल्या पिकांवर रानडुकरांनी धुमाकूळ घालणे सुरू केले आहे. त्यामुळे हाती आलेल्या पिकांच्या रक्षणासाठी आता बळीराजाला थंडीच्या दिवसांत रात्री जागावे लागत आहे.
कोरपना, राजुरा तालुक्यातील भोयेगाव, भारोसा, विरूर, गाडेगाव, जैतापूर, नांदगाव, कवठाळा, एकोडी, कुर्ली, मारडा, पेल्लोरा, धिडसी, वरोरा, साखरी, चार्ली निर्ली, कडोली, गोवरी, पोवनी, बाबापूर, मानोली, चुनाळा, चनाखा, सातरी, विहिरगाव, नलफडी, सुर्ती, सोंडो, सुमठाना, वरूर, पाचगाव, चिंचोली, अंतरगाव यासह अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर डुकर, हरीण, रोई व कोल्हा आदी वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रात्र जागून पिकांचे रक्षण करीत आहेत. रानडुकरांचे कडप शेतात धुमाकूळ घालून उभे पीक नष्ट करतात. तसेच कापणी झालेल्या पिकांचीही नासधूस करतात. पीक वाचविण्यासाठी घडपड सुरु असून रामेश्वर निमकर या शेतकऱ्याचे तीन एकर शेतातील धानपीक वन्यप्राण्यांने नष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)