महाऔष्णिक केंद्रात वन्यजीव जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:33 PM2018-10-03T22:33:16+5:302018-10-03T22:33:42+5:30
महाऔष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना वन्यजीव, अधिवास आणि सुरक्षा आदी विषयांवर हॅबिटन्ट कन्झर्व्हेशन संस्थेच्या वतीने जागृतीवर कार्यक्रम घेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर :महाऔष्णिक केंद्रातील कर्मचाऱ्यांना वन्यजीव, अधिवास आणि सुरक्षा आदी विषयांवर हॅबिटन्ट कन्झर्व्हेशन संस्थेच्या वतीने जागृतीवर कार्यक्रम घेण्यात आला.
महाऔष्णिक केंद्र हे शहरापासून लांब अंतरावर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडेझुडुपे वन्यजीव व साप, बेडूक, सापसुळी, सरडे, पालींचा नेहमी संचार असतो. कामगारांना याची माहिती मिळाल्यास वन्यप्राणी व नागरिकांच्याही जीवाला धोका होणार नाही. याकरिता अभियंता मंडल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. साप : समज व गैरसमज या विषयावर संस्थेचे केशव कुळमेथे साईनाथ चौधरी यांनी मार्गदर्शन केले. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात ७० पेक्षा अधिक सरीसृपांच्या प्रजाती आढळतात. विषारी सापांमध्ये स्पेटकल्ड कोब्रा, कॉमन क्रेट, सास्केल वायपर, रुसेल्स वायपर स्लेन्डर, कोरल स्नेक तर निमविषारी सापांमध्ये ग्रीन वाइन स्नेक,कॅट स्नेक,फॉर्स्टन्स कॅट स्नेकचा समावेश होता. बेडकांचेही विविध प्रकार आढळले आहेत, असेही त्यांनी सांगितले. इंडियन बुल, कॉमन टोड, बलून फ्रॉग, पेन्टेड फ्रॉग व फुंगोईड फ्रॉग आदी बेडकांचे प्रकार जिल्ह्यातील समृद्ध जैवविविधतेची जाणीव करून देतात. पालींमध्ये नार्दन हाऊस गेको, इंडियन गेको, कॉलेगल ग्राउंड गेको, लीफ टोड गेको, तरमाईट हिल गेको तसेच घोरपड, कासवेही आढळतात. हे सर्व जीव निसर्गाचे साथीदार आहेत. त्यांच्या सुरक्षेतूनच निसर्ग सुरक्षित राहू शकतो. सापांना विनाकारण न मारता सर्पमित्रांना बोलावून सुरक्षित जंगलात सोडावे, अशी माहिती देण्यात आली. संस्थेचे दिनेश खाटे यांच्या मार्गदर्शनाखाली केशव कुळमेथे, रविकिरण गेडाम,प्रणय मगरे, चेतन साव, ज्ञानेश्वर चौधरी आदींनीही विचार मांडले. शिबिरामुळे सापांविषयी वैज्ञानिक माहिती मिळाल्याची प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली. अभियंता मंडल यांनी प्रास्ताविक केले.