नागभीड परिसरात वन्यप्राणी मानव संघर्ष विकोपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 05:00 AM2020-07-21T05:00:00+5:302020-07-21T05:00:29+5:30
नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले.
घनश्याम नवघडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : एकाच आठवड्यात दोन शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या ‘त्या’ नरभक्षक वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे. तो वाघ जेरबंद झाला म्हणून तालुक्यातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष संपला असे मुळीच नाही. उलट हा संघर्ष निर्माणच होणार नाही यासाठी नागरिक आणि वनविभाग यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर्चस्व सिद्धही केले. नागभीड तालुका हा जंगलव्याप्त तालुका आहे. या तालुक्याला ताडोबा आणि उमरेड कर्हांडला हे अभयारण्य अतिशय जवळ आहेत. त्यातच दोन वर्षांपूर्वीच शासनाने नागभीड तालुक्यातील घोडाझरीलाही अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबा आणि उमरेड कऱ्हाडल्याच्या मधोमध घोडाझरी अभयारण्य असल्याने वाघांच्या भ्रमंतीस मोठा वाव असून यातूनच नागभीड तालुक्यात सध्या वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तीन चार वर्षांपूर्वी उमरेड - कऱ्हाडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन हे दोन वाघ नेहमीच नागभीड तालुक्याच्या भ्रमंतीवर यायचे. विशेष म्हणजे श्रीनिवासनची तर नागभीड तालुक्यातील विलम गावाजवळ हत्या करण्यात आली होती. या तालुक्यातील मौशी ढोरपा, पाहार्णी, बोंड, बाळापूर, कोसंबी गवळी, डोंगरगाव, तळोधी, गोविंदपूर, गीरगाव, कचेपार या परिसरातील अनेक गावे जंगलाने वेढलेली आहेत. या भागाचा कानोसा घेतला तर वाघ आणि बिबट यांचे दर्शन रोजच अनेकांना होत आहे. या वन्यपशुंनी पाळीव प्राण्यांवर हल्ले करुन त्यांना ठार केल्याच्यासुद्धा घटना नेहमीच घडत आहेत. या घटना ग्रामीण जीवनाने पाहिजे त्या प्रमाणावर मनावर घेतल्या नव्हत्या. पण या महिन्यात तुकूम, सोनुली व मांगरूड येथे घडलेल्या वाघाच्या हल्याच्या तीन व त्याअगोदर कोसंबी, गवळी आणि मिंडाळा येथील घटनांनी तालुक्यातील ग्रामीण जीवन हादरुन गेले. या पाचही हल्ल्यात शेतकरीच ठार झाले आहेत. आणि तेही वाघांनी शेतात येऊन शेतकºयांना शिकार केली असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.
उपाययोजना करणे गरजेचे
तालुक्यात पाचही घटनांमध्ये वाघाने शेतात शेतकऱ्याला ठार केले. शेत जंगलानजिक आहे. नागभीड तालुक्यातच हजारो शेतकऱ्यांची शेती जंगलानजीक आहे. या जंगली प्राण्यांनी कितीही हल्ले केले तरी शेतकऱ्यांना शेती ही करावीच लागणार आहे. असे हल्ले होऊ नयेत, मानव वन्यप्राणी संघर्ष वारंवार उद्भवू नये, यासाठी शासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.