वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी

By admin | Published: May 8, 2017 12:32 AM2017-05-08T00:32:19+5:302017-05-08T00:32:19+5:30

सध्या जिल्ह्यात उन्हाची दाहकता प्रचंड वाढत आहे. जंगलातील पाणवठे आटत चालले आहे.

Wildlife-The Spark of Human Conflicts | वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी

वन्यजीव-मानव संघर्षाची ठिणगी

Next

पाणवठे आटले : शेतकरी आणि वाघांचे संरक्षण करण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या जिल्ह्यात उन्हाची दाहकता प्रचंड वाढत आहे. जंगलातील पाणवठे आटत चालले आहे. अन्न व पाण्याच्या शोधात वाघ, अस्वल, बिबट व इतर वन्यप्राण्यांचा शेतशिवारात व गावकुसात वावर वाढत आहे. यात कधी वन्यप्राणी तर कधी मनुष्यहानी होत आहे. एकूणच जिल्ह्यात मानव-वन्यप्राणी संघर्ष पेटत असल्याचे चित्र दृष्टीस पडत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह वन्यप्रेमीही यामुळे चिंताग्रस्त आहेत. यात आणखी बळी जाऊ नये म्हणून यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नुकतेच उमरेड कारांडला अभयारण्यातून जय गायब आणि श्रीनिवासन गायब होवून शिकार झाल्याची घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षापासून चंद्रपूरसह संपूर्ण विदर्भात मानव-वन्यजीव संघर्षात वाढ होत आहे. तसेच अशा अनेक घटनाची वाच्यता पण होत नाही. ग्रामीण नागरिक भीती म्हणून तर शेतकरी शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून विविध वैध-अवैध मार्गाचा अवलंब करतात. यात वाघ व वन्य जीवांचा अकारण बळी जातो, असे अभ्यासाअंती लक्षात येत आहे. यात मनुष्यहानीही होत आहे. हा संघर्ष असाच वाढत राहिला तर ना शेतीचे ना वाघाचे संवर्धन होईल. म्हणून शासनाने आणि वनविभागाने सर्व वन्यजीव भ्रमण मार्ग, शेती, विद्युत मार्ग आणि खेडे यांचा सविस्तर अभ्यास करून यावर त्वरित मार्ग काढावा, अशी मागणी ग्रीन प्लानेट सोसायटी या संस्थेने केली आहे.
गेल्या सहा महिन्यात तीन वाघ, दोन बिबट, दोन अस्वल आणि तीन रानगवे विद्युत प्रवाहाने मारले गेले आहेत. विषबाधा आणि वायर ट्रेप करून अनेक वन्यजीव मारले जात असल्याच्या घटनात वाढ होत आहे. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात सरपणासाठी गेलेल्या पुरुष-महिलांचाही मृत्यू झाला आहे. अनेक शेतकरी वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. जनावरांवरही हल्ले होऊन त्यांचाही बळी जात आहे. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.
ताडोबात आणि अन्य व्याघ्र प्रकल्पात चांगले वन्यजीव संवर्धन होत असल्यामुळे वाघ, बिबट, अस्वल, नीलगाव, हरीण आणि इतर वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परंतु प्रादेशिक आणि वनविकास महामंडळाच्या क्षेत्रात म्हणावे तसे चांगले संरक्षण होत नाही. विशेष म्हणजे, ताडोबा आणि इतर अभयारण्यातून स्थलांतर करणारे वाघ व वन्यजीव हे याच जंगलात प्रवेश करतात आणि याच वनक्षेत्रात हजारो गावे आणि हजारो हेक्टर शेत जमिनी आहे. वाघ-बिबट-अस्वल पाणी पिण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी आणि स्थलांतर करण्यासाठी शेतीत आणि गावाजवळ प्रवेश करतात. यामुळे ग्रामीण लोकात दशहत निर्माण होते. तसेच डुक्कर, नीलगाय आणि हरणे शेती खाऊन टाकतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी शेतकऱ्यांचा वनविभागावरील रोष सातत्याने वाढत आहे. वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेताजवळून जाणाऱ्या जीवंत तारांना अवैध मार्गाने कुंपणाला जोडून पिकांचे संरक्षण करतात. यात वाघ, बिबट, अस्वल आणि वन्य जीवांचा बळी जात आहे. जिवाच्या भीेतीने ग्रामीण लोक पण विद्युत प्रवाह, विष प्रयोग, वायर ट्रेप आणि इतर मार्गाचा अवलंब करून स्वत:चे संरक्षण करतात. यात मानव आणि वन्यजीव दोघांचाही मृत्यूू होतो, हे सत्य आहे. या संघर्षाचा गैरफायदा शिकारी सुद्धा घेतात. या मानव आणि वन्यजीव संघर्षात आतापर्यंत चंद्रपूर आणि विदर्भात शेकडो माणसांचा आणि वाघांचा मृत्यू झालेला आहे. हा संघर्ष आता असाच वाढत राहणे शेतकरी, ग्रामीण नागरिक आणि वाघ-वन्यजीवासाठी घातक ठरणार आहे. म्हणून शासन आणि वन विभागाने त्वरित प्राधान्याने या विषयाकडे लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

अशा कराव्यात उपाययोजना
जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने वन्यप्रेमी व सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, ग्रिन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी वनविभागाला काही उपाययोजना सूचविल्या आहेत. अभयारण्ये यांची भ्रमणमार्गे निश्चित करून अधिसूचना जाहीर करावी, ब्रह्मपुरी हे भ्रमण मार्गात येत असल्याने आणि वाघांसाठी चांगले क्षेत्र असल्याने याला कन्झर्वेशण रिझर्व/अभयारण्य घोषित करावे. त्यामुळे अशा संवेदनशील क्षेत्राचे संवर्धन करता येईल, वाघ व चांगले वन्यजीव असलेल्या प्रादेशिक आणि वनविकास महामंडळ वनात ताडोबासारखी स्वतंत्र वन्यजीव संरक्षण दलाची स्थापना करण्यात यावी आणि सबंधित वन अधिकाऱ्यांच्या कार्यात हलगर्जी झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, वन विभाग आणि विद्युत विभाग यांची संयुक्त समिती नेमून त्यांचेमार्फत भ्रमण मार्गातील वन क्षेत्रातून आणि शेतीतून जाणाऱ्या लाईनवर नियमित निगराणी आवश्यक करावी, हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, शेतकऱ्यांना भ्रमणमार्गात वन्यजीवामार्फत बाधित न होणारी पिके घेण्यासाठी प्रवृत्त करावे, पिकाच्या संरक्षणासाठी मजबूत व व्यावहारिक सोलार फेन्सिंग अल्प दरात किंवा मोफत पुरविण्यात यावी, शेतीसाठी लाकडाऐवजी धातूची अवजारे पुरवावी, विषारी कीटकनाशकाऐवजी जैविक खते आणि कीटकनाशके पुरवावी, गावातील पिण्याचे पाणी, शेती, गेस, रोजगार आदी विकास कामे प्राधान्याने करून जंगलातील गावांची व गावकऱ्यांची वनावर अवलंबिता कमी करावी, वनविभागातर्फे वन्यजीव संघर्ष कमीकरण्यासाठी सतत जन जागरण, उपक्रम व उपाय योजना सुरू ठेवाव्या यासारख्या उपाययोजना त्यांनी सूचविल्या आहेत.

Web Title: Wildlife-The Spark of Human Conflicts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.