२४ नोव्हेंबरपर्यंत वीजबिलासाठी जुन्या नोटा स्वीकारणार
By admin | Published: November 16, 2016 01:45 AM2016-11-16T01:45:24+5:302016-11-16T01:45:24+5:30
थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणने २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या....
महावितरण : वीजबिल भरण्याचे आवाहन
चंद्रपूर : थकीत वीजबिल भरण्यासाठी महावितरणने २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून महावितरणच्या घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहेत. त्यासाठी महावितरणने निर्धारित केलेले सर्व वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त निदेर्शानुसार, वीजबिल भरण्यासाठी महावितरणकडून २४ नोव्हेंबरपर्यंत घरगुती व वैयक्तिक ग्राहकांच्या वीज बिलापोटी जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारण्यात येणार आहते. ग्राहकांचे वीजबिल जेवढ्या रक्कमेचे राहील तेवढ्या रक्कमेच्या जुन्या पाचशे व हजाराच्या नोटा स्वीकारणार आहे.
वीजबिलाचा भरणा करण्यासाठी महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहेत. वीजबिलापोटी आगाऊ स्वरुपात रक्कम स्वीकारण्यात येणार नाही.
वीजग्राहकांना त्वरित वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरणने आवश्यक पूर्वतयारी केली असून राज्यातील सर्वच केंद्रांवर महावितरणच्या नियमित कर्मचाऱ्यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचारी महावितरणकडून उपलब्ध करून देण्यात अर्ज ग्राहकांकडून भरून घेऊन जुन्या नोटासह वीजबिल स्वीकारतील.
याशिवाय ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणने विशेष संकेतस्थळ व मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यावरही ग्राहकांना वीजबिल भरता येणार आहे. या योजनेचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. (नगर प्रतिनिधी)