‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना रुचेल का?’, चंद्रपूरची दारूबंदी उठवू नका, विद्यार्थिनीची मुख्यमंत्र्यांना साद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 03:06 AM2020-11-04T03:06:11+5:302020-11-04T06:24:54+5:30
Chandrapur : दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर : ‘माझे बाबा झिंगून घरात यावेत, हे आदित्य दादांना
रुचेल का?’ अशी विचारणा करीत चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेऊ नका, अशी भावनिक साद
ब्रह्मपुरी तालुक्यातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली आहे.
२०१५ मध्ये राज्यात भाजपचे सरकार असताना औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली.
या बंदीचे काहींनी स्वागत केले,
तर काहींनी निर्णय चुकीचा
असल्याचे मत नोंदविले. दरम्यान, सरकार बदलताच दारुबंदी उठवण्याबाबतच्या चर्चांना वेग आला. अनेकांना दारू सुरु होण्याचे वेध लागले आहेत.
दारूबंदी झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक असे चित्र
बघायला मिळाले. अनेक वेळा
संघर्षही उद्भवतो. सरकार बदलल्यानंतर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी मागे घेण्याबाबत अनेक घडामोडी घडल्या. यामुळे जिल्ह्यात खरेच दारू सुरू होईल,
अशी भीती या विद्यार्थिनीला आहे. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र पाठवले. दारूच्या विपरीत परिणामांची अनेक उदाहरणे तिने पत्रात दिली आहेत.
दारूबंदी उठवू नये, यासाठी ब्रह्मपुरी येथील सेवानिवृत्त प्राचार्य डाॅ. देवीदास जगनाडे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये दारूबंदी उठवू नये, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
गडचिरोलीची दारूबंदी कायम ठेवा, कलावंत-विचारवंत सरसावले
- गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायम ठेवावी, असे आवाहन राज्यातील ४० प्रमुख साहित्यिक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे केले असल्याची माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी दिली.
- गडचिरोली दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. तिला ग्रामसभा व स्त्रियांच्या चळवळीचे समर्थन प्राप्त आहे.
- दारूबंदी उठविण्यासंदर्भात सुरू असलेला समितीचा विचार रद्द करावा आणि दारूबंदी अधिक प्रभावी करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली असल्याचे ‘सर्च’च्या वतीने कळविण्यात आले.
- आवाहन करणाऱ्यांमध्ये साहित्यिक अनिल अवचट, सतीश आळेकर, मिलिंद बोकील, रामदास भटकळ व प्रमोद मुनघाटे, कलावंतांमध्ये अमोल पालेकर, संध्या गोखले, वैज्ञानिक-प्रशासक अनिल काकोडकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यपाल महाराज, ‘अंनिस’चे अविनाश पाटील, वनराईचे गिरीश गांधी, मेधा कुलकर्णी, मेळघाटचे डॉ. सातव, मुक्तांगणच्या मुक्ता पुणतांबेकर, अंजली दमानिया, दिल्लीहून खासदार विनय सहस्रबुद्धे, गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी नेते देवाजी तोफा व हिरामण वरखेडे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. सतीश गोगुलवार, राळेगणसिद्धीवरून अण्णा हजारे आदींनी दारूबंदीचे समर्थन केले असल्याचे डॉ. बंग यांनी कळविले.