बल्लारपूरला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:46 PM2018-11-19T21:46:04+5:302018-11-19T21:46:52+5:30

चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Will make Ballarpur a center for employment generation | बल्लारपूरला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार

बल्लारपूरला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : डायमंड कटिंग सेंटरमधील शंभर उमेदवारांना अपॉइंटमेंट लेटर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा रोजगार युक्त बनविण्यासाठी आपण कटिबद्ध असून आगामी काळात बल्लारपूर शहर रोजगार निर्मितीचे केंद्र बनविणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
बल्लारपूर येथे वर्षभरापूर्वी निर्माण झालेल्या डायमंड कटिंग सेंटरमधील पहिल्या शंभर उमेदवारांना प्रमाणपत्रासह अपॉइंटमेंट लेटर देण्याचा सोहळा वन विकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंग चंदेल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांशी मोबाईलवरून संवाद साधताना पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्यात.
बल्लारपूर परिसराला रोजगार निर्मितीचे केंद्र बनविण्याचा आपला संकल्प आहे. यासाठी वेगवेगळे उपक्रम बल्लारपूर शहरांमध्ये व आसपास सुरू होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध होतील, अशा पद्धतीचे उपक्रम, उद्योग आणि प्रकल्प या भागात उभे होत आहे, असे शुभेच्छा संदेशांमध्ये ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी चंदनसिंह चंदेल यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व अपॉइंटमेंट आॅर्डर देण्यात आली. या सर्व मुलांना या प्रशिक्षणानंतर हमखास नोकरी मिळेल, अशी हमी देण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी सुरू केलेल्या या प्रकल्पाला ठरविल्याप्रमाणे न्याय देता आल्याबद्दलचे चंदेल यांनी समाधान व्यक्त केले.
बल्लारपूर हिऱ्याला पैलू पाडणारे शहर-चंदेल
यावेळी बोलताना चंदनसिंह चंदेल म्हणाले, बल्लारपूर शहराला हिऱ्यांना पैलू पाडणारे शहर म्हणून आगामी काळात ओळखले जाणार आहे. या संदर्भातील वेगवेगळे उद्योग व्यवसाय या शहरात कसे येतील, या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी प्रशिक्षण प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी तुमच्या हातात कौशल्य आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची तयारी ठेवा, ज्या ठिकाणी तुमच्या कौशल्याला न्याय मिळेल, अशा ठिकाणी नोकरी करण्यासाठी सिद्ध राहा. मेहनत करणाऱ्याला निश्चितच यश मिळते, असे स्पष्ट केले. पहिल्या बॅचच्या सर्वच्या सर्व मुलांना ठरविल्याप्रमाणे प्रशिक्षण संपल्यानंतर त्या दिवशीच हातामध्ये अपॉइंटमेंट लेटर देता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
निवासाची व्यवस्था
ज्या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना नोकरी मिळाली आहे, त्याठिकाणी सुरुवातीच्या काही काळामध्ये त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याचीही घोषणाही यावेळी केली. तसेच पहिल्या बॅचला त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठीदेखील या कंपनीमार्फत प्रवासाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
हजार तरुणांना संधी
राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पातून दरवर्षी एक हजार तरुणांना प्रशिक्षण व रोजगाराची हमी देण्यात आली आहे. डायमंड कटिंग प्रोजेक्ट माध्यमातून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे.

Web Title: Will make Ballarpur a center for employment generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.