पेरीव पत्र सादर न करणारे अनुदानापासून वंचित राहणार
By admin | Published: April 6, 2017 12:31 AM2017-04-06T00:31:32+5:302017-04-06T00:31:32+5:30
राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या हंगामात अत्यल्प उतारी मिळाली. सोयाबिनला दरही कमी मिळाले.
सोयाबीन उत्पादक शेतकरी : निबंधक कार्यालयाने अर्ज नाकारले
वरोरा : राज्यातील सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांना या वर्षीच्या हंगामात अत्यल्प उतारी मिळाली. सोयाबिनला दरही कमी मिळाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबिन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल दोनशे रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. परंतु अनुदानाकरिता शेकडो शेतकऱ्यांनी सोयाबिन नमुद असलेले पेरीव पत्र व सातबारा जोडला नाही. त्यामुळे शेतकरी सोयाबिन अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यात वर्तविली जात आहे.
चालू हंगामात कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ३१ डिसेंबर पुर्वी सोयाबिन विकणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान शासनाने जाहीर केले. एका शेतकऱ्याला वीस क्विंटल पर्यंत अनुदान मिळणार आहे. अनुदानाकरिता बाजार समितीकडे सादर केलेल्या अर्जासोबत बाजार समितीकडे माल विकल्याची पावती, आधार कार्ड, बँक पासबुकाची सांक्षाकीत प्रती जोडण्यात आल्या आहेत. बाजार समितीने अनुदानाचे अर्ज सहाय्यक निबंधक व जिल्हा निबंधक कार्यालयाकडे सादर केले.
अर्जाची सदर कार्यालयाने छाननी केली तेव्हा, सन २०१६-१७ या वर्षातील सोयाबिन पेरा प्रमाणपत्र तसेच सातबारावर सोयाबिन पीक नमूद असणे आवश्यक असल्याचा शेरा निबंधक कार्यालयाने मारला. त्यामुळे शेकडो सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबीत पडले आहेत. त्यामुळे पेरापत्र व सातबारावर सोयाबिन पेरा नमूद असलेले कागदपत्र जोडले नाही असे शेकडो शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शासनानेच यामध्ये काही नियामत सुधारणा करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
बाजार समितीचे आवाहन
ज्या सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदानाकरिता कृषी उत्पन्न बाजार समिती वरोराकडे अर्ज सादर केले आहे व ज्यांनी सन २०१६-१७ वर्षातील सोयाबिनचे पेरपत्रक किंवा सोयाबिन नमूद सातबारा जोडला नाही, त्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये पेरापत्रक द्यावे, असे आवाहन सभापती विशाल बदखल, उपसभापती राजू चिकटे, सचिव चंद्रशेन शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.