बेरोजगारांवरील अन्याय खपवून घेणार नाही
By admin | Published: July 11, 2016 12:54 AM2016-07-11T00:54:44+5:302016-07-11T00:54:44+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणि कारखाने उभारण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे धोरण शासनाने निर्माण केले आहे.
मुकुंद खैरे : दुर्गापूर येथे समाज क्रांती आघाडीची शाखा स्थापन
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे आणि कारखाने उभारण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे धोरण शासनाने निर्माण केले आहे. त्यामुळे यापुढे स्थानिक बेरोजगारांवर अन्याय करण्यात आल्यास तो खपवून घेणार नाही, असा इशारा समाजक्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांनी दिला.
दुर्गापूर येथे समाजक्रांती आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली.यावेळी प्रा. खैरे बोलत होते.
खैरे पुढे म्हणाले की, औद्योगिक विकासातून राज्यातील सर्व सूक्ष्म, लघु, मोठ्या व विशाल औद्योगिक उपक्रमामध्ये किमान ८० स्थानिक उमेदवारांना नौकऱ्यामध्ये प्राधान्य देण्याचे धोरण शासनाने अवलंबिलेले आहे. त्यानुसार सर्व उद्योग घटकांनी लोकांना पर्यवेक्षकीय श्रेणीत ५० व इतर श्रेणीत ८० कर्मचारी नियुक्त करावी.हा निर्णय शासनाने १७ नोव्हेंबर २००८ रोजी घेतला परंतु अलीकडे एमएसईबी पॉवर प्लॉन्टस व डब्ल्यूसीएल (कोळसा खाणी) अंतर्गत कार्यरत सेन्थिल इंटरप्राईजेस, पदमापूर ओसीएम मधील स्थानिक कामगारांना कंपनीचे दीड वर्षे काम समोर असूनही काढण्यात आले. रिक्त जागेवर परप्रांतीयांना कामावर घेतल्या जात असल्याने परिसरातील बेरोजगार युवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दुर्गापूर परिसरातील बेरोजगारांच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होत असल्याने समाजक्रांती आघाडी बेरोजगारांवर होत असलेल्या अन्यायाविरूद्ध बेरोजगारांना संघटीत करून उद्योग मालकावर कायदेशीर आंदोलनाद्वारे दबाव निर्माण करणार आहे, असेही ते म्हणाले.
दुर्गापूर येथे समाज क्रांती आघाडीच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते प्रज्योत पुणेकर, उपाध्यक्ष उमेश नगराळे, सचिव अहमद पठान, सहसचिव शेख ताहीर भाई, संघटक दशरथ गेडाम आणि सहसंघटक म्हणून रवींद्र नागपुरे यांची निवड करण्यात आली. पद्मापूर शाखा अध्यक्षपदी विकास शामकुंवर यांना नियुक्त करण्यात आले.
स्थानिक बेरोजगारांचा प्रचंड लढा उभारण्याचे दृष्टिने लवकरच बेरोजगारांचा महामेळावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्याचे ठरले. बेरोजगारांनी आपल्या कायदेशीर अधिकारासाठी संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे, असे आवाहन जिल्हा युवा आघाडी प्रमुख रवी धवन यांनी केले. प्र्रास्ताविक तालुका प्रमुख अरुण चवरे यांनी केले. जिल्ह्याचे जेष्ठ कार्यकर्ते सागर बोरकर, अमर नगराळे, सविता कांबळे, आशिर्वाद भोयर, रंजन जीवने, ज्ञानेश्वर खोब्रागडे, ज्योती मेश्राम आदींची उपस्थिती होती. संचालन प्रज्योत पुणेकर यांनी केले तर आभार दशरथ गेडाम यांनी मानले. (प्रतिनिधी)