शाळा कोसळल्यानंतरच निर्लेखन करणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:01 PM2018-08-06T23:01:41+5:302018-08-06T23:02:08+5:30
बाम्हणी येथील जि.प. प्राथमिक शाळा पूर्णपणे मोडकळीस आली़ पण संबंधित विभागाने ही पाडण्यासाठी अद्याप कार्यवाहीच केली नाही. अपघातानंतरच शिक्षण विभागाला जाग येईल का ? असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : बाम्हणी येथील जि.प. प्राथमिक शाळा पूर्णपणे मोडकळीस आली़ पण संबंधित विभागाने ही पाडण्यासाठी अद्याप कार्यवाहीच केली नाही. अपघातानंतरच शिक्षण विभागाला जाग येईल का ? असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे़
बाम्हणी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी पुरेशा वर्गखोल्या आहेत़ मात्र, या खोल्यांना बरेच वर्ष झाले़ त्यामुळे तीन वर्गखोल्या मोडकळीस आल्या़ या खोल्यांचे निर्लेखन करण्याचा ठराव ग्रामपंचायतने पारीत केला होता़ ठराराची प्रत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आली होती़ या घटनेला दोन वर्ष झाले आहेत. पण आश्चर्याची बाब अशी की जिल्हा परिषद शिक्षण विभागाने फक्त एकच वर्ग खोली पाडली. उर्वरित दोन वर्गखोल्या अर्धवट स्थितीत ठेवल्या़ या वर्गखोल्यांच्या मलब्याचे ढेले लोंबकाळलेल्या अवस्थेत आहेत़ हे ढेले केव्हा कोसळतील याचा काही नेम नाही.
निर्लेखित केलेल्या व मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या पाडले असते तर मुलांना खेळणे व परिपाठासाठी मैदान उपलब्ध झाले असते़ सध्या याठिकाणी जागाच नसल्याने मुलांचा परिपाठ वर्गांमध्येच घेण्यात येत आहे. दोन वर्गखोल्या मोडकळीस आल्या असल्याने दुर्लक्षित आहेत. त्यांचा कोणताही वापर होत नसल्यामुळे कृमीकिटकांचे माहेरघर बनल्या. पं.स.चा शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे़
गाव नगर परिषदेत पण मालकी जि.प.ची
बाम्हणी हे गाव तेथील ग्रा.पं. बरखास्त करून नागभीड नगर परिषदमध्ये समाविष्ठ करण्यात आले़ पण ही शाळा जि.प. कडेच आहे. सद्यस्थितीत गावात ग्रामपंचायत नाही़ त्यामुळे निर्वाचित झालेल्या नगरसेवकांनी वर्गखोल्या पाडण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी नागरिकांनी केली़