जि. प. शाळा बंद होणार का ? शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:01 IST2025-03-05T13:59:04+5:302025-03-05T14:01:03+5:30
Chandrapur : आधार व्हॅलिड नसल्याने बसला फटका

Will the ZP school be closed? Fear of surplus teacher
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार शिक्षकांची नियुक्ती पटसंख्येच्या आधारे न होता आधार व्हॅलिडच्या संख्येनुसार होत आहे. राज्य शासनाच्या नवीन संचमान्यतेच्या धोरणामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक मोठ्या संख्येने अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याची भीती देखील व्यक्त होत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी
नवीन संचमान्यतेचे धोरण अवलंबण्यात आले आहे. यामुळे शिक्षकांत नाराजीचा सूर आहे. पटसंख्येअभावी शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती सतावत आहे. जिल्ह्यात ११ ते २० पटसंख्या असलेल्या शाळा आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांचे आधार व्हॅलिड करून घ्यायचे होते. मात्र, आधार व्हॅलिड आणि पटसंख्येत तफावत असून पटसंख्या कमी झाली आहे.
नव्या संचमान्यतेनुसार इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत एकूण २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळेवर शून्य शिक्षकांना मान्यता देण्यात आल्याचे सांगितले जाते. नव्या धोरणामुळे शिक्षक अतिरिक्त होणार असून, शाळांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांत अतिरिक्त ठरण्याची भीती आहे.
जिल्हा परिषद शाळांवर हे संकट का आले?
नवीन संचमान्यता धोरण, खासगी शाळांचे बाढ़ते आकर्षण, पटसंख्येतील घट आदी बदलांमुळे जिल्हा परिषद शाळांमसोर संकट उभे झाले आहे.
संचमान्यतेचे धोरण काय?
- संचमान्यतेच्या नवीन धोरणानुसार ७८ विद्यार्थ्यांमागे तीन शिक्षक असतील. यामुळे ज्या शाळांमध्ये ६ वी ते ८ वीच्या वर्गात २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथे शिक्षकच राहणार नाहीत.
- १५० पेक्षा कमी विद्यार्थी 3 असतील तर तेथे मुख्याध्यापकाचे पदही राहाणार नाही. या नव्या संचमान्येचे शिक्षकांकडून विरोध होत आहे.
१५४२ शाळा चंद्रपूर जिल्ह्यात
- जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक १ हजार ५४२ शाळा आहेत.
- या शाळांमध्ये गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच पाच हजारांवर शिक्षक या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत आहेत.
"जिल्ह्यातील प्राथमिक शाळेकडून आलेल्या जवळपास ३०९ शाळेच्या संचमान्यतेत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्या दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत."
- अश्विनी सोनवाणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक, चंद्रपूर