वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 11:42 PM2018-02-13T23:42:58+5:302018-02-13T23:46:48+5:30

जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास व मध्यरात्री अवकाळी वादळी पाऊस झाला. तर सिंदेवाही, वरोरा, भद्रावती व राजुरा या तालुक्यात पावसासोबतच गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Windy rain, hailstorm | वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

Next
ठळक मुद्देरब्बी पिके भुईसपाटप्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचे सर्व्हेक्षण सुरूअनेक गावांचा वीज पुरवठा खंडीत

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास व मध्यरात्री अवकाळी वादळी पाऊस झाला. तर सिंदेवाही, वरोरा, भद्रावती व राजुरा या तालुक्यात पावसासोबतच गारपीट झाल्याने शेकडो हेक्टरवरील रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व नुकसानग्रस्तांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले असून महसूल विभागाने सर्व्हेक्षणाला सुरुवात केली आहे. बुधवारपर्यंत पिकांच्या तसेच जनावरांच्या प्राणहानी नुकसानीचा अंदाज घेतला जाण्याची शक्यता आहे.
प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार सिंदेवाही तालुक्यातील एका गावात, वरोरा तालुक्यात ३० गावामध्ये, भद्रावती तालुक्यात ४ गावांमध्ये तर राजुरा तालुक्यात ३ गावांमध्ये गारपीट झाल्याची माहिती आहे. गारपीटीमुळे धोपटाळा येथे एक गाय व वासरु मृत्यूमुखी पडले. मुधोली, वडाळा, आष्टा, मानोरा, मारडा, धिडसी, निरळी, चिकणी, माढेळी, टेंभुर्डा आदी गावांमध्ये गारपीट झाली.
तर वीज कोसळून महालगाव येथे एका बैलाचा मृत्यू झाला. प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे.
चंद्रपूर व मूल तालुक्यात सर्वाधिक पाऊस
सोमवारी रात्री चंद्रपूर व मूल तालुक्यात सर्वाधिक ३४ मिमी पावसाची नोंद झाली. तर बल्लारपूर तालुक्यात २७, सावली १६, गोंडपिपरी ३.२, पोंभूर्णा १२, चिमूर २०, सिंदेवाही-१२.१, वरोरा ११.२, भद्रावती ८ , राजुरा १३.५, जिवती १०, कोरपना २०.४, ब्रम्हपूरी २४.२ व नागभीड तालुक्यात १९.२ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
वरोरा तालुक्यात ३० गावातील रब्बी पिके पावसाने उद्ध्वस्त
आॅनलाईन लोकमत
वरोरा : खरीप हंगामात अत्यल्प उत्पादन त्यानंतर बोंड अळीने कापसाचे नुकसान, असा ससेमीरा बळीराज्याच्या मागे असतानाच रब्बी पिके हातात येण्याआधीच सोमवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने भुईसपाट झाली आहेत.
सोमवारी रात्री अर्धा ते पाऊण तास वरोरा तालुक्यात गारपीट झाली. त्यात तालुक्यातील चरूर (खटी), एकोना, वनोजा, मार्डा, चिनोरा, सालोरी, आबामक्ता, वडगाव, चारगाव आदी तीस गावातील पीक उद्धवस्त झाली आहेत. रबी पिकांमध्ये हरभरा व गहू पिकाला सर्वाधिक फटका बसला असून गहू पीक पूर्णत: जमिनीवर झोपून गेले तर हरभºयाचे दाणे फुटून पडले आहेत. तर भाजीपाला व आंब्याच्या बहारही जमीनदोस्त झाला आहे. शेतामध्ये उभ्या झाडांना कापूस दिसेनासे झाले आहे.
बोंड अळीने कापसावर आक्रमण केले. त्याचे पंचनामे होवून अहवाल शासन दरबारी पोहचला. मात्र शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असताना रबी पिकांचे गारपिटीने नुकसान झाल्याने शेतकºयांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. मंगळवारी उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, तहसीलदार सचिन गोसावी, कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, कृषी विस्तार अधिकारी विजय खिरटकर यांच्या चमूने अनेक शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
वादळाने भ्रमणध्वनी मनोरा कोसळला
सावली : तालुक्यातील कवठी येथील भ्रमणध्वनी मनोरा सोमवारी झालेल्या वादळाने क्षतीग्रस्त झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मागील सात-आठ वर्षांपुर्वी सदर मनोरा कवठी येथे उभारण्यात आला होता. मनोºयाच्या सुरक्षा संदर्भात दर तीन वर्षाने परिक्षण केले जात जाते. मात्र जोरदार वादळाने मनोरा कोसळून पूर्णपणे क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे परिसरातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. तसेच गावातील अनेक विद्युत खांब क्षतीग्रस्त झाल्याने कवठी गाव सोमवारच्या रात्रीपासून अंधारात आहे.
मारडा येथील सहा घरांची छप्परे उडाली
आॅनलाईन लोकमत
गोवरी : राजुरा तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या मराडा (लहान) गावाला अवकाळी पाऊस व गारपिटीचा जबरदस्त तडाखा बसला. सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास आलेल्या वादळाने क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. गावातील सहा घरांचे छप्पर उडाली असून काही कळायच्या आत हे कुटुंबच उघड्यावर आले. या पावसाने कापूस, हरभरा, गहू, ज्वारी ही पीके पुर्णत: भुईसपाट झाली आहेत.
गावातील विलास नगराळे, नितेश भोयर, प्रदिप धोटे, श्रावण पिंपळकर, छत्रपती कोडापे, काशिनाथ भोयर यांच्या घरावरील टिनाचे पत्रे वाºयाच्या प्रचंड वेगाने उडून गेले. छप्परे उडालेल्या घरातील कापूस, अन्न-धान्य व जीवनउपयोगी सर्व वस्तू पावसात भिजून गेले.
रात्रीची घटना असल्याने उघड्यावर आलेल्या कुटुंबाला शेजारच्या घराचा आधार घ्यावा लागला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवित हानी झाली नाही. मारडा, गोवरी, पोवनी, साखरी, पेल्लोरा, धिडशी, वरोडा, चार्ली, निर्ली, कढोली, बाबापूर, चिंचोली परिसरातील शेकडो हेक्टर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांनी पाहणी केली असून उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना तत्काळ मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरपंच उषा पोडे, तलाठी विनोद खोब्रागडे, पोलीस पाटील सतीश भोयर उपस्थित होते.
बल्लारपूर तालुक्यात ४९२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान
बल्लापूर : सोमवारी सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी पावसाने बल्लारपूर तालुक्यातील रबी हंगामाचे ४९२ हेक्टर क्षेत्र प्रभावित झाले. बल्लारपूर तालुक्यात गहू ६८ हेक्टर, ज्वारी २९.२० हेक्टर, मुंग १७ हेक्टर, हरभरा ८६ हेक्टर, लाखोळी १३ हेक्टर, जवस ५ हेक्टर, भाजीपाला १३७ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी लागवड केली. काही शेतकऱ्यांची कापूस वेचनी सुरू होती. अशातच वादळी पावसाने सोमवारी चांगलेच झोडपले. परिणामी शेतातील उभे पीक भुईसपाट झाले. या वादळी पावसाचा तडाखा तालुक्यातील विसापूर, नांदगाव (पोडे), हडस्ती, चारवट, बामणी (दुधोली), दहेली, लावारी, कळमना, आमडी, पळसगाव, किन्ही, कोठारी, काटवली (बामणी), इटोली, मानोरा, कवडजी, मोहाळी, कोर्टिमक्ता येथील शेतकऱ्यांना मोठ्या फटका बसला आहे.
रस्त्यावर झाडे कोसळल्याने मार्कंडा यात्रा बसफेऱ्या रद्द
सावली : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा येथील यात्रेसाठी सावली तालुक्यातील हरंबा-लोंढोली मार्गावरील साखरी घाट येथून अनेक भाविक जातात. मात्र सोमवारच्या वादळी पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने सावली ते साखरी बसगाड्या रद्द करण्यात आल्या. यात्रा फटका विद्यार्थ्यांसह भाविकांना बसला. अनेक भाविकांनी आपल्या प्रवास मार्गात बदल करीत मुल मार्गाने प्रवास केला. मंगळवारी दुपारी १ वाजतानंतर सावली-साखरी बसफेऱ्या सुरू झाल्या. तहसीलदारांनी यावेळी पाहणी केली. मंगळवारीही सायंकाळच्या सुमारास चंद्रपूरसह अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली.
रस्त्यावर पडला गारांचा सडा
माढेळी : सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे गहू, हरभरा, तुरी पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. माढेळीपासून १० कि.मी. अंतरावर असलेल्या पांझुर्णी ते चरूर (खटी) या रस्त्यावर अक्षरश: ३ ते ४ इंच गारांचा थर साचलेला होता.
अवकाळी पावसाने गडचांदूर परिसरातील गहू, हरभरा पिकांची नासाडी
गडचांदूर : गडचांदूर व परिसरात सोमवारी रात्री पडलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने रबी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गहू, हरभरा ही प्रमुख पिके भुईसपाट झाली असून शेतकºयांना प्रचंड आर्थिक फटका बसला आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरीत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
नवरगाव परिसरात गारांचा पाऊस
नवरगाव : नवरगाव परिसरात सोमवारी वादळी व गाराससह झालेल्या पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोमवारी सायंकाळी ८.३० च्या सुमारास वादळी वाºयासह पावसाला सुरूवात झाली. तसेच गारांसह पाऊस झाल्याने हरभरा, तूर, गहू, लाक व इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळामुळे परिसरातील विजपुरवठा रात्रभर खंडीत होता. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास माजरी परिसरातही जोरदार वादळी व गारांचा पाऊस झाला. वीज पुरवठाही खंडीत झाला.
किडीचा प्रार्दुभाव
घोडपेठ : सोमवारच्या सायंकाळी तसेच रात्री झालेल्या अवकाळी व वादळी पावसाने घोडपेठ व परिसरातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी विजेच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील गहू, हरभरा या शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मागील आठ ते दहा दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर किडीचा धोका वाढला आहे.

Web Title: Windy rain, hailstorm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.