अंधाऱ्या रात्रीवर मात करून ‘ते’ जिंकले

By admin | Published: June 19, 2014 12:03 AM2014-06-19T00:03:07+5:302014-06-19T00:03:07+5:30

शहरात मंगळवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तापमानाचा चढता आलेख अचानक खाली आला. परंतु वादळी वाऱ्याने शहरातील विजेच्या तारा तुटल्या. खांब वाकले. शहर मध्यरात्रीपर्यंत काळोखात होते.

'Winning' by overcoming the dark night | अंधाऱ्या रात्रीवर मात करून ‘ते’ जिंकले

अंधाऱ्या रात्रीवर मात करून ‘ते’ जिंकले

Next

ब्रम्हपुरी: शहरात मंगळवारी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तापमानाचा चढता आलेख अचानक खाली आला. परंतु वादळी वाऱ्याने शहरातील विजेच्या तारा तुटल्या. खांब वाकले. शहर मध्यरात्रीपर्यंत काळोखात होते. पावसामुळे थंडावलेल्या या वातावरणात शहर सुखाने झोपले असताना दुसरीकडे मात्र वीज वितरण कंपनीचे कर्मचारी रात्रभर जागून तुटलेल्या तारा जोडण्याचे काम करीत होते. मध्यरात्रीनंतर हे काम पूर्ण झाले. शहरात उजेड पसरला. तेव्हा कुठे या कर्मचाऱ्यांना विश्रांती मिळाली.
सध्या ब्रम्हपुरी तालुक्यात वादळाची मालिकाच सुरू आहे. मंगळवारी वादळाने सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत शहरात थैमान घातले. काही वेळाने बऱ्यापैकी पाऊसही बरसला. परंतु वादळाने शहरातील विजेच्या तारा तुटल्या. शहर अंधारात बुडाले. परंतु वीज वितरण कंपनीचे लढवय्ये कर्मचारी पुढे सरसावले. शिरीष चांभारे, दुर्वास खरकाटे, बावणे व इतर कर्मचाऱ्यांनी कुठे फॉल्ट झाला आहे याचा बॅटरीच्या साहाय्याने शोध घेत एकएक फॉल्ट काढण्याचे धाडस भर पावसातही सुरू ठेवले.
वीज पूर्ववत होईल का, असा प्रश्न विचारणारे नागरिकांचे फोन वीज कंपनीच्या कार्यालयात खणखणत होते. त्यावर, ‘रात्री २ वाजले तरी चालेल, पण कोणताही भाग अंधारात राहणार नाही’ असे उत्तर शिरीष चांभारे यांच्याकडून दिले जात होते. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाला यश आले. शहराची वीज रात्री दोन वाजेपर्यंत पूर्ववत झाली. अंधार दूर झाला. वीज वितरण कंपनीतील या कर्मचाऱ्यांची नागरिकांकडून प्रशंसा केली जात आहे. सहायक अभियंते विजय मेश्राम यांनीही कर्मचाऱ्यांसोबत रात्र जागून काढली. ते कर्मचाऱ्यांना वारंवार प्रोत्साहन देत होते. एरवि अधिकारी मोबाईलवर रात्री संपर्क टाळतात. परंतु मंगळवारचा अनुभव मात्र वेगळा होता. (प्रतिनिधी)

Web Title: 'Winning' by overcoming the dark night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.