नद्यांवर वक्रदृष्टी
By admin | Published: June 4, 2014 11:39 PM2014-06-04T23:39:22+5:302014-06-04T23:39:22+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची
आजारात वाढ : उद्योगांतील दूषित पाणी नदीत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने वर्धा, पैनगंगा, इरई व उमा या नद्या वाहतात. या नद्यांवर जिल्ह्याची तहान व सिंचन अवलंबून आहे. जिल्ह्यात औद्योगिक क्रांती झाल्यामुळे उद्योगांची वक्रदृष्टी या नद्यांवर पडली आहे. या नद्यांमध्ये विष ओतण्याचे काम उद्योग सातत्याने करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हे मोठे जलस्रोतही प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातून वाहणारी वर्धा नदी जणू नागरिकांपेक्षा उद्योजकांचेच पोट भरण्यासाठी अस्तित्वात आली असावी, असे एकंदरीत परिस्थिती पाहता दिसून येते. वरोरा, बल्लारपूर, राजुरा तालुक्यातील पॉवर कंपन्या, सिमेंट कंपन्या याच नदीवर अवलंबून आहे. या नदीतील मोठय़ा प्रमाणात पाण्याचा उपसा या कंपन्या करतात आणि राक्षसी परतफेड करतात. आपल्या कंपनीतील रसायनयुक्त पाणी नदीत सोडले जात असल्याने वर्धासारखी मोठी नदीही दूषित झाली आहे. वेकोलि प्रशासनानेही या नदीवर वाट्टेल तसा अत्याचार केला आहे. इरई नदीचीही तीच परिस्थिती करून टाकली आहे. या नदीचे तर नैसर्गिक पात्रच वेकोलिने बदलवून टाकले आहे. इरई वाचावी म्हणून काही पर्यावरणवाद्यांनी आंदोलन सुरु केले आहे. मात्र प्रशासनाला कधी जाग आली नाही. बल्लारपूर पेपरमीलमधील रसायनयुक्त पाणी या नदीत सोडल्यामुळे नदीचे पात्रच काही ठिकाणी विषारी झाले आहे.
झरपट नदी तर, पूर्वी चंद्रपूरची जीवनदायिनी होती. मात्र या नदीचा डोळ्यादेखत नाला करून टाकला आहे. झरपट नदी वाचविण्यासाठी एकाही राजकीय नेत्याने वा प्रशासकीय अधिकार्याने धडपड केली नाही. उलट ती प्रदूषित करणार्यांकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. शहरातील ज्या भागात नदीच्या प्रवाहाने स्पर्श करून पवित्र केले, तेथील पावित्र्य कायम न राखता सांडपाणी नदीत सोडण्यात आले. याशिवाय शहरातील सुमारे ६0 टक्के मलवाहिन्या झरपटमध्येच विलीन करून स्थानिक राज्यकर्त्यांनी संपूर्ण नदीचे वाटोळे केले आहे.
१५ कि.मी. एवढी कमी लांबी असतानाही या नदीचे जिल्हा प्रशासन जतन करू शकले नाही. उलट नदीची गटारगंगा कशी करता येईल, याचाच पध्दतशीर प्रयत्न झाला. या नदीतून वाळूचा मोठय़ा प्रमाणात उपसा करण्यात आला. पात्रातील बारीकसारिक खडकंही गायब करण्यात आले. आता तर नदीपात्रात अनेक ठिकाणी वाळूच दिसत नाही. वाळूऐवजी चिखल, घराघरातून आणि नालीतून आलेल्या मळाचे साम्राज्य दिसते. शहरातील बंगाली कॅम्प, तुकूम, अंचलेश्वर गेट, संतोषी माता मंदिर परिसर, ताडबन परिसर, हनुमान खिडकी परिसर, पठाणपुरा वार्ड या भागातील सांडपाणी नदीत सोडले जाते. मच्छीनाल्याचेही काही पाणी रामाळा तलावात जाते आणि बाकी सर्व पाणी झरपट नदीतच मिसळते. याशिवाय शहरातील कचरा, निर्माल्य, प्लास्टिक पिशव्याही नदीतच टाकल्या जातात. विशेष म्हणजे, शहरातील सुमारे ६0 टक्के मलवाहिन्या पूर्वीपासून झरपट नदीतच विलीन करण्यात आल्या आहेत.
या नदीत प्राणवायूचे प्रमाण अत्यंत कमी आणि सल्फेट, हेवी मेटल अशा घातक रसायनाचे प्रमाण अधिक आढळून आले होते. अर्थात, कोणत्याही परिस्थितीत झरपट नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही, हे स्पष्टच आहे. असे असताना महाकाली यात्रेसाठी येणार्या भाविकांना आंघोळीसाठी याच पाण्याचा आधार घ्यावा लागतो. जिल्ह्यात नानाविध संस्था सामाजिक कार्य करीत आहेत. चंद्रपूर जिल्हा प्रदुषित जिल्हा म्हणून घोषित झाला आहे. विविध मुद्यांवर या संस्थांनी आजवर आंदोलने केली आहेत. मात्र जिल्ह्यातून वाहणार्या नद्या आणि प्रदूषणामुळे त्यांची होत असलेली वाताहात त्यांना अंतर्बाह्य अस्वस्थ करीत नाही. त्यामुळेच यासाठी एकही संस्था दमदार आंदोलन उभे करू शकली नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडला जातो. मात्र वाहती नदी डोळ्याआड करून तिचे वाटोळे होत असतानाही जीवनदायिनींना वाचविण्यासाठी प्रशासनाला गदगद हालविले जात नाही. बोटावर मोजण्याएवढय़ा एकदोन जणांनी आपआपल्या परीने थोडेफार प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना पुढार्यांची आणि प्रशासनाची फारशी साथ मिळाली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ नावाचे कार्यालय आणि त्यातील अधिकारी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात कार्यरत आहेत, मात्र त्यांनी कसलेही प्रयत्न केले नाही.जिल्ह्यातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत पर्यावरण संतुलनाचे प्रयत्न होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.