शील, प्रज्ञेच्या प्रेरणेसाठी जागतात अख्खी रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:21 PM2019-02-02T23:21:37+5:302019-02-02T23:21:59+5:30
विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.
राजकुमार चुनारकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.
अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धाचा धम्म भारतात अस्तित्वात होता. कालांतराने सम्राट अशोक यांच्यानंतर धम्माला उतरती कळा लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे भारतात धम्म पुन्हा गतिमान झाला. यासाठी भिक्षू संघ कार्य करीत आहे. २५ वर्षांपूर्वी संघरामगिरी येथे भन्ते महाथेरो ज्ञानज्योती यांनी गुजगव्हाण येथून पाच किमी अंतरावर भिक्षु संघासाठी तपोभूमी निर्माण केली. या तपोभूमीवर ३० ते ३१ जानेवारीला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान ग्रहण करतात. संघारामगिरीत भन्ते महाथेरो ज्ञानजोती यांनी या बौद्ध उपासकांसाठी महापरित्रान पाठाचे आयोजन केले होते.
धम्माला वैज्ञानिक अधिष्ठान
रात्री १० वाजता सुरू झालेल्या ज्ञानसोहळ्याचा समारोप पहाटे ५ वाजता झाला. महापरित्राण पाठातून निर्वाणपदाचा साक्षात्कार, आनापानसती आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करून जीवन मंगलमय करण्याची संहिता अनुभवतात. चित्ताला प्रज्ञापूर्वक आदेश देऊन दहा पारमिताचे पालन करण्याचा संकल्प साक्षी भावनेने केले जाते. यासाठी बुद्धाने सांगितलेल्या विविध तृष्णांचे निसरण करण्याचे बळ व मार्ग या अधिष्ठानामधून उपासकान्ाां गवसतो. वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे हे अधिष्ठान ज्ञानाचा ठेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन-तीन तास एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम एक म्हटले कंटाळा येतो. मात्र अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मक्लेश, आत्मपिडा अथवा कष्ट नसल्याने जीवन जगण्याचा सम्यक मार्ग उपासकांना प्राप्त होतो. त्यासाठी सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प अंगिकारने अपेक्षित असते. यंदा दोन हजार उपासकांनी कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून धम्मातील शील,समाधी,व प्रज्ञा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला.