‘काश...’ लघु चित्रपटातून ग्रामीण कलाकार करणार हेल्मेटवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:12 PM2018-08-03T22:12:58+5:302018-08-03T22:14:00+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या प्रभावशाली भूमिका या लघु चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : चंद्रपूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केल्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीपर लघु चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माता राजू रहिकवार आणि गणेश रहिकवार दिग्दर्शित ‘काश’ असे या लघु चित्रपटाचे नाव असून जिल्ह्यातील मातीत घडलेल्या ग्रामीण कलाकारांनी साकारलेल्या प्रभावशाली भूमिका या लघु चित्रपटातून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक यामुळे अपघातात निरपराधांचा हकनाक बळी जात आहे. या पाश्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात नुकतीच दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली. याचा अचूक वेध घेत हेल्मेटच्या जनजागृतीसाठी राजू रहिकवार व गणेश रहिकवार बंधूनी सामाजिक बांधिलकी जोपासत लघुचित्रपट करायचे ठरविले.
या लघुचित्रपटात वडील आपल्या मुलाला हेल्मेट घेण्यासाठी पैसे देतो. परंतु, मुलगा त्या पैसाची मित्रासोबत पार्टी करुन मनसोक्त दारु ढोसतो. या दारुच्या नशेत तो वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत सिग्नल तोडतो. भरधाव दुचाकी चालविण्याच्या नादात त्याच्या दुचाकीचा अपघात होतो आणि यात मुलाचा मृत्यू होतो. काश... मुलाने डोक्याला हेल्मेट घातले असते तर अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली नसती आणि त्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला नसता.
एकंदरीत या लघुचित्रपटाचे सर्व कथानक हेल्मेट जनजागृतीभोवती फिरते. या लघुचित्रपटात काम करणारे सर्व कलाकार ग्रामीण भागातील असून अविनाश दोरखंडे (वडील) संगीता बावणे (आई), सुरज आमटे (पुत्र) महेंद्र खंडेलवार (पोलीस निरीक्षक, सुरेश बानोत (हवालदार) या सर्व कलाकारांनी या चित्रपटात प्रभावशाली भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातून हेल्मेटच्या जनजागृतीवर भर देण्यात आला आहे.
मेकअप, केशरचना सजावट वर्षा दोरखंडे, राधिका दोरखंडे यांनी केली आहे. त्यामुळे या लघु चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील, असा विश्वास निर्मात्याला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजुरा, बललारपूर, चंद्रपूर परिसरात करण्यात येत आहे. हेल्मेटच्या जनजजागृतीवर आधारीत असलेला या लघुचित्रपटात ग्रामीण कलाकारांनी चित्रपट निर्मितीसाठी टाकलेले पाऊल नक्कीच आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे.