तळागाळातील कार्यकर्ता मातोश्रीसोबत; तालुकाप्रमुख कोणाच्या पाठीशी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 05:00 AM2022-06-30T05:00:00+5:302022-06-30T05:00:20+5:30
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीने मंगळवारी बैठक घेऊन बंडखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आम्हीच खरी शिवसेना असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्याने राज्यातील राजकारणात वादळ उठले. त्यामुळे जिल्हा व तालुकास्थळावरील कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की, बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या बाजूने हा प्रश्न निर्माण झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील कौल जाणून घेतले असता तळागाळातील कार्यकर्ता व तालुकाप्रमुखही मातोश्रीसोबत असल्याचा दावा केला आहे.
शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यापासून काही नेत्यांनी बंडखोरी केल्याने अशा घटना नवीन नसल्याचे बोलले जाते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेविरुद्ध बंडखोरी केली. शिवाय आम्हीच खरी शिवसेना, असा दावा केल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणीने मंगळवारी बैठक घेऊन बंडखोरांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. आम्हीच खरी शिवसेना असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने असल्याचे त्यांनी जाहीर केले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी शिवसैनिक सभा बैठका घेत आहेत. चंद्रपुरातही बैठक घेऊन बंडखोर आमदारांविरूद्ध निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील सभा घेतल्या जात आहेत.
जिल्हाप्रमुख उद्धव यांच्यासोबत
चंद्रपूर जिल्हा शिवसेनाप्रमुख संदीप गिरे यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाेबत असल्याचे जाहीर केले. बंडखोर हे बेइमान आहेत. त्यांना शिवसैनिक धडा शिकवतील, असा दावाही त्यांनी केला.
सर्वच तालुकाप्रमुखांचा ठाकरेंना पाठिंबा
चंद्रपूर, पोंभुर्णा, मूल, सावली, गोंडपिपरी, राजुरा, जिवती, कोरपणा, ब्रह्मपुरी, सिंदेवाही, भद्रावती तालुकाप्रमुखांचाही उद्धव ठाकरे यांनाच पाठिंबा दर्शविला आहे. बंडखोर येतात आणि जातात, पक्षाची संघटनशक्ती संपणारी नाही. आम्ही मातोश्रीसोबतच आहोत, असा दावा केला आहे.
शिंदेंशी संबंधच नसल्याचा दावा
nबाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी द्रोह करून बंडखोरी केलेल्या एकनाथ शिंदे गटाशी शिवसैनिकांचा संबंध नाही. जे पक्षातून बाहेर गेले ते बेइमान आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुकाप्रमुख मातोश्रीसोबतच राहणार, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.
कोण कोणाच्या पाठिशी?
अनेक वर्षांपासून आम्ही शिवसेनेसोबत आहोत. उद्धव ठाकरे यांना आम्ही कदापि सोडून जाणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा त्याग आम्ही विसरणार नाही.
-विनोद ऊर्फ शिक्की यादव, उपजिल्हाप्रमुख, बल्लारपूर
उद्धव ठाकरे यांच्या प्रेरणेमुळे आम्ही तालुक्यात शिवसेना वाढवली. बंडखोरांनी स्वार्थासाठी इतरांशी हातमिळवणी केली. चिमूर तालुक्यातील शिवसैनिक मातोश्रीसोबत आहेत.
-श्रीहरी सातपुते, तालुकाप्रमुख, चिमूर
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे मातोश्रीसोबतच आहोत. शिवसेनेशी बंडखोरी करून बाहेर निघाले ते शिवसैनिक नाहीत.
-पिंटू मेश्राम,
तालुकाप्रमुख शिवसेना, वरोरा
नागभीड तालुक्यातील कोणताही शिवसैनिक बंडखोरांसोबत नाही. त्यांनी पक्षाशी बेइमानी केली. आम्ही कोणत्याही संकटात मातोश्रीलाच सहकार्य करू.
-मनोज लडके,
तालुका उपप्रमुख, नागभीड