घरकुल रद्द केल्याने ‘त्या’ कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीत थाटले बिऱ्हाड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 12:18 PM2023-04-26T12:18:08+5:302023-04-26T12:23:37+5:30
हिरापूर येथील घटना : न्याय मिळेपर्यंत हटणार नसल्याचा इशारा
शंकरपूर (चंद्रपूर) : शासनाकडून एका कुटुंबाला घरकुल मंजूर झाले. मात्र, नमुना आठ अ नुसार जागेची मालकी व कर आकारणी नसल्याच्या कारणावरून घरकुल रद्द केल्याने त्या कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीतच बिऱ्हाड मांडल्याचा धक्कादायक प्रकार हिरापूर येथे मंगळवारी घडला. दरम्यान, न्याय मिळेपर्यंत हटणार नाही, असा इशारा या कुटुंबाने दिल्याने ग्रामपंचायतचे पदाधिकारी पेचात पडले आहेत.
हिरापूर येथील नूतन गोमा दडमल हे आपल्या आई-वडिलांच्या जुन्या घरात राहतात. त्या घराची मालकी आईच्या नावाने असून, गृहकर पावतीही आहे. नूतन दडमल यांना घरकुल मंजूर करण्यात आले. घरकुलासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने लाभार्थीला नमुना आठ अ नुसार जमीन मालकी सिद्ध करावी लागले. दडमल यांच्या नावाने ग्रामपंचायतमध्ये कर आकारणी उपलब्ध नाही. ही आकारणी नसल्याने मंजूर घरकुल ग्रामपंचायतने रद्द केले. ग्रामपंचायत आईच्या नावाने सुरू असलेले गृहकर घेत आहे. ही जागा आईची असल्याने तिला तरी घरकुल द्यायला पाहिजे. मात्र, ग्रामपंचायतीने मंजूर घरकुल हेतुपुरस्सर रद्द केले, असा आरोप नूतन दडमल यांनी केला आहे.
इतक्या वर्षांपासून आम्ही येथील रहिवासी असून, आईच्या नावाने गृहकर पावती असताना कर आकारणी का नाही? ग्रामपंचायत रेकार्डवर आकारणीमध्ये नाव नाही आणि नवीन कर आकारणी ग्रामपंचायत देत नाही. त्यामुळे घरकुलाअभावी राहायचे कुठे, असा प्रश्न करत नूतन दडमल यांनी पत्नी, तीन मुले व संसारोपयोगी साहित्य घेऊन मंगळवारी ग्रामपंचायतीच्या वऱ्हांड्यात बिऱ्हाड मांडले आहे. लक्ष्मी नाजूक ननावरे यांचेही नाव घरकुल यादीत आहे. पण, त्यांच्या घराची कर आकारणी नाही. ग्रामपंचायतीला कर आकारणीसाठी अनेकदा अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दडमल यांनी केला. संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर तोडगा काढणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
काय आहे नमुना नऊ ल आणि आठ अ?
नमुना नऊ ल म्हणजे या जमिनीवर ग्रामपंचायत गृहकर लागू करते. मात्र, ही जमीन संबंधित व्यक्तीच्या मालकीची नसते. त्यामुळे जमीन मालकी हक्क नसल्याने घरकुलसारख्या योजनांचा लाभ घेता येत नाही. नमुना आठ अ मध्ये मालकी हक्काचा समावेश असते. संबंधित जमिनीवर कर आकारणीसोबतच तो जमीनमालक ठरतो. ठिय्या आंदोलन करणारे नूतन दडमल यांच्या आईच्या नावाने नमुना नऊ ल नुसार गृहकर लागू आहे; पण जमीनमालकी नाही, असा दावा ग्रामपंचायत करीत आहे.
उपसरपंच म्हणतात...
ग्रामपंचायत रेकार्डवर नूतन गोमा दडमल यांच्या नावाने घरासाठी आवश्यक असलेली जमीन नाही. त्यांच्या आईच्या नावाने २०१५ पर्यंत कर आकारणी होती. त्यानंतर नमुना आठ अ वरून आईचे नाव खारीज झाले. नूतन दडमल यांच्या नावाने मालमत्ताच नसल्याने नियमानुसार कर आकारणी करता येत नाही, अशी माहिती हिरापूरच्या प्रभारी सरपंच मंगला मूनघाटे यांनी दिली.