ओबीसी समन्वय समितीवरील गुन्हे मागे घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:16+5:302020-12-06T04:29:16+5:30
वरोरा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे ...
वरोरा : २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी या मागणीसह अन्य मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे ओबीसी समन्वय समितीने संविधान दिनी मोर्चा काढला. या मोर्चाद्वारे शासन तसेच प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र कोरोनाचे संकट पुढे करीत पोलिसांनी आयोजन समितीवर गुन्हे दाखल केले. पोलीस प्रशासनाची ही कारवाई अन्यायकारक असून समन्वय समितीवरील गुन्हे मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा वरोरा येथील ओबीसी बांधवांनी दिला आहे. यासंदर्भात उपविभागीय अधीकारी रवींद्र शिंदे यांना निवेदन दिले आहे.
ओबीसी समाज मोठ्या संख्येने आहे. असे असतानाही या समाजाची जनगणना करण्यात येत नाही. त्यामुळे समाजबांधवांना अनेक सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देवून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणीसह अन्य मागण्याही या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
शिष्टमंडळात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, वरोरा धणोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष रमेश राजुरकर, श्याम लेंडे, योगीता लांडगे, सुधाकर जिवतोडे, भास्कर नित, सुरेश बुरान, प्रा. काकडे, विठ्ठलराव भेदुरकर, निलकंठ वाढई, अशोक पोफळे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी बांधव सहभागी झाले होते.
फोटो : एसडीओ रवींद्र शिंदे यांना निवेदन देताना ॲड. मोरेश्वर टेमुर्डे, रमेश राजुरकर आदी.