दिव्यांगांच्या मदतीसाठी १५ दिवसांत समिती
By admin | Published: September 18, 2016 12:47 AM2016-09-18T00:47:05+5:302016-09-18T00:47:05+5:30
वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.
पालकमंत्र्यांची घोषणा : बल्लारपुरात दिव्यांग तपासणी शिबिर
चंद्रपूर : वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती येत्या १५ दिवसांत आपण गठित करणार असून शासन दिव्यांग बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, सहायक उत्पादन केंद्र एलिस्को तसेच भारत सरकारच्या माध्यमातुन दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क मदत व सयंत्रांचे वितरण करण्याच्या दृष्टीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन बल्लारपूर येथील संत तुकाराम महाराज सभागृह येथे करण्यात आले. उदघाटन समारंभात ना. मुनगंटीवार बोलत होते.
यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचलार्वार, डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर, तुषार सोम, ब्रीजभूषण पाझारे, वनिता कानडे, रेणुका दुधे, अजय कौटीकवार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
तपासणी शिबिराला दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नियमाची अडचण नाही : तीन महिन्यानंतर साहित्याचे वितरण
चंद्रपूर : दिव्यांग हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय विचारपूर्वक वापरला आहे. शरिराच्या एखाद्या भागाला काही कारणास्तव जेव्हा अपंगत्व प्राप्त होते, तेव्हा परमेश्वर त्या भागाला विशेष दिव्यशक्ती प्रदान करतो. त्यामुळे अपंग असा उल्लेख न करता त्यांना दिव्यांग, असे पंतप्रधानांनी संबोधले आहे, अशी माहिती ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपुरात आयोजित विशेष तपासणी शिबिराप्रसंगी दिली. या शिबिराला दिव्यांग बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांना सहानुभूतीची नाही तर संधीची आवश्यकता आहे. अनेक दिव्यांगांनी आपले श्रेष्ठत्व आपल्या कौशल्याच्या व कर्तृत्वाच्या बळावर सिध्द केल्याचा इतिहास आहे. सुरदास अंध होते. पण त्यांच्या सुरावटींनी हजारों रसिक मंत्रमुग्ध व्हायचे. येत्या काळात अपंग वित्त विकास महामंडळाच्या नावात बदल करून दिव्यांग वित्त विकास महामंडळ, असे नाव या महामंडळाला देण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
या शिबिरात तपासणीनंतर तीन महिन्यांत दिव्यांग बांधवांना साहित्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी नियमांची कोणतीही अडचण येणार नाही.
या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना मदत मिळेलच, याची ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा गुहे यांनी केले. या जिल्हास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिरासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. तालुकानिहाय स्टॉल्स उभारण्यात आले व दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली.
दिव्यांग बांधवांसाठी भोजनाची व्यवस्थासुध्दा करण्यात आली होती. प्रशासनासह विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते व्यवस्थांमध्ये सक्रीयपणे सहभागी होते. शिबिरात सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. तीन महिन्यांनंतर दिव्यांग बांधवांना साहित्य व संयंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
२५ हजार व्यक्तींना चश्मे वाटप
गेल्या चार वर्षांत आम्ही ५०० दिव्यांग बांधवांना तिनचाकी सायकली दिल्या असून ३५ हजार व्यक्तींना नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ दिला. त्यातील २५ हजार व्यक्तींना चश्मे वितरित केले असून ४५०० नेत्र रूग्णांवर नि:शुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. ५०० विधवा भगिनींना शिवणयंत्राचे वितरण केले. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आम्ही सातत्याने सेवाभाव जपला आहे. येत्या २१ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आपण आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार स्थानिक विकास निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करून दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून साहित्य खरेदीसाठी १० लक्ष रुपये खर्चाची तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.