आदिवासींच्या आंदोलनानंतर दोन तासातच यंत्रणा हादरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:17 PM2019-07-22T23:17:32+5:302019-07-22T23:17:45+5:30
शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : शासन निर्णयानुसार गोंडपिपरी तालुक्यातील शबरी घरकूल योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. वारंवार पत्रव्यवहार करूनसुध्दा तब्बल दोन वषार्नंतरही एमआरइजीएस अंतर्गत अनुदानाची रक्कम हाती न लागल्यामुळे संतप्त लाभार्थ्यांनी गोंडपिपरी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले. या दरम्यान अधिकाऱ्यांना वेठीस धरल्यानंतर अवघ्या दोन तासातच लेखी आश्वासन मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची सांगता केली.
६ जानेवारी २०१७ रोजीच्या शासन निर्णयानुसार सदर योजनेतर्गत लागू असलेला एमआरईजीएस फंड लाभार्थ्यांना मिळाला नाही. संतापलेल्या लाभार्थ्यांनी अखेर जि.प. सदस्य अमर बोडलावारांच्या नेतृत्वात आज सोमवापासून गोंडपिपरी पं.स.कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली. सकाळी ११ वाजतापासून सुरू झालेल्या या आंदोलनात गोंडपिपरी तालुक्यातील २० ते २५ घरकुल लाभार्थी सहभागी झाले होते. दोन तासानंतर चंद्रपूर जिल्हा परिषद व गोंडपिपरी पंचायत समितीची यंत्रणा आंदोलनस्थळी दाखल झाली. त्यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.