कोरपना तालुक्यातील पोचमार्ग डांबरीकरणाविना
By admin | Published: December 29, 2014 11:39 PM2014-12-29T23:39:40+5:302014-12-29T23:39:40+5:30
कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले.
रत्नाकर चटप - नांदाफाटा
कोरपना तालुक्यातील अनेक पोचमार्ग अद्यापही डांबरीकरणाविनाच आहे. दहा वर्षापूर्वी ग्रामीण भागातील नागरिकांना शहराशी जोडता यावे, या हेतुने प्रत्येक गावातून पोचमार्ग तयार करण्यात आले. यामध्ये मुरुम गिट्टी टाकून रस्त्यांचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र अनेक वर्ष लोटूनही डांबरीकरण न झाल्याने गिट्टी उघडी पडली असून रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
तालुक्यातील चनई-धनकदेवी, शरज-हेटी, कोरपना-पारडी, जेव्हरा-गांधीनगर, कोरपना-कातलाबोडी, बोरगाव-कातलाबोडी, पिपर्डा-कारगाव, हातलोणी-कोरपना, कोडशी-तुळशी-कोरपना, भिप्पा- मांगलहिरा, नांदाफाटा-लालगुडा, बिबी-राजुरगुडा, आवारपूर- कोलापूरगुडा-कढोली-वनोजा, बाखर्डी-निमनी-गोवरी, आवारपूर-गाडेगाव, हिरापूर-पालगाव, कवठाळा-विरूर, लखमापूर-भुटरा, धुनकी-निमनी, बाखर्डी-नांदाफाटा, नोकारी-पिंपळगाव, नांदाफाटा-आसन, भोयगाव-भारोसा, लखमापूर-कारव आदी पोचमार्ग उखडलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास कठीण होत आहे.
यातील अनेक पोचमार्ग शेतातून जातात. या मार्गासाठी शेतकऱ्यांनी काही प्रमाणात आपल्या जमीनी दिल्या आहेत. तर औद्योगिक वसाहतीत जाणाऱ्या पोचमार्गामुळे धुळ उडत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे. मात्र, शेतातून पोचमार्ग गेल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना चिखलातून जाण्याचा त्रास कमी झाला. परंतु, आता या रस्त्यांची अवस्था वाईट झाली असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.
बऱ्याच पोचमार्गावर छोटे-छोटे पुल तयार करण्यात आले आहे. काही पुलाला तडे गेलेले दिसत असून या पुलांची दुरुस्ती करणे नितांत गरजेचे आहे. त्याचबरोबर पुलाची उंची कमी असल्याने शाळकरी मुले व शेतकऱ्यांना पावसाळ्यात खोल पाण्यातून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पोचमार्गावरुन एक चारचाकी वाहन जाण्याइतपत जागा राहत नाही. रस्त्याच्या कडेला झुडपे वाढली आहेत. यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा वेध घेणे कठीण होत आहे. गिट्टी उखडल्याने दुचाकी वाहनांचे अपघात झाल्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आहेत.
तालुक्यात अंबुजा, अल्ट्राटेक, माणिकगड व मुर्ली अॅग्रो अशा चार सिमेंट कंपन्या आहेत. यामध्ये अनेक कामगार १० ते १५ किमी अंतरावरुन कामाला जातात. रात्रपाळीला अंतर व वेळ वाचविण्यासाठी पोचमार्गानेच प्रवास केला जातो. परंतु, रस्ता खराब झाल्याने वाहन चालविणे धोक्याचे ठरत आहे. काही लोकप्रतिनिधींनी आपल्या सत्ता काळात गावाशी-गाव जोडता यावा या हेतुने पोचमार्ग तयार केले. यासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च झाला. परंतु, डांबरीकरणाच्या प्रतिक्षेत पोचमार्ग जैसे-थे आहेत. केवळ आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष मात्र या रस्त्यांकडे नाही आणि प्रशासनही बघ्याची भूमिका घेऊन आहे.