खडसंगीत पाणी पुरवठा अवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:22 AM2021-05-29T04:22:13+5:302021-05-29T04:22:13+5:30

खडसंगी : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळीअवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त ...

Without music water supply | खडसंगीत पाणी पुरवठा अवेळी

खडसंगीत पाणी पुरवठा अवेळी

Next

खडसंगी : मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र वेळीअवेळी नळ सोडण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. यापूर्वी सकाळी पाणीपुरवठा केला जात होता.

गडचांदूर-जिवती मार्गावरील खड्डे बुजवा

गडचांदूर: गडचांदूर-जिवती मार्गाची दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले. मात्र याकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मार्गावरील वाहतूक प्रभावित होत आहे. वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. परंतु, रस्त्यांची दुरवस्था झाली. त्रासदायक ठरलेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

अवैध वाहतुकीला आळा घालावा

जिवती : तालुक्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. अवैध प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत आहे. मागील आठवड्यात वाहनांची तपासणी करण्यात आली. मात्र, काही दिवसातच ही मोहीम थंड झाली. अवैध वाहतुकीला जोर आला आहे. याला तातडीने आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

डासांचा प्रादुर्भाव

बह्मपुरी: तालुक्यातील विविध गावांमध्ये अनेक नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. परिणाम, डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

स्वच्छता मोहीम गतिमान करावी

मूल : शहरात स्वच्छता कर्मचारी दैनंदिन स्वच्छता करीत आहेत. मात्र, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येते. शिवाय, गांधी चौक आणि अन्य वॉर्डांतील चौकांतही रस्त्यावर वाहने ठेवण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत. स्वच्छता व पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पाणी पुरवठ्याकडे लक्ष देण्याची मागणी

बल्लारपूर : जिल्ह्यातील अनेक गावात पाणी पुरवठ्याची बोंब आहे. पाण्याच्या टाक्या असून त्या शोभेच्या वास्तू ठरल्या आहेत. पाणी पुरवठा योजना मंजूर असतानाही पाणी मिळत नसल्याने अनेक गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी आहे.

शेतीपूरक योजना गावात पोहोचविण्याची गरज

गडचांदूर : कोरपना तालुक्यातील जनता शेतीवरच अवलंबून आहे. दरवर्षीच अस्मानी व सुल्तानी संकटांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. कृषी व अन्य विभागाच्या योजना गावात न आल्याने शेतकरी निराश आहेत.

रानडुकरांचा बंदोबस्त करावा

भद्रावती : तालुक्यात काही गावातील शिवारात जंगली प्राण्यांनी शेतात धुमाकूळ सुरू केला आहे. अनेक ठिकाणी दुबार पीक घेण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हाती आलेले पिकांचे प्राण्यांमुळे नुकसान होत आहे.

रस्त्यावरील सांडपाण्याने आरोग्य धोक्यात

सिंदेवाही : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडल्याने नाल्या सांडपाण्याने भरल्या आहेत. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप आहे.

वेकोलीमध्ये धुराचे साम्राज्य

राजुरा : राजुरा तालुक्यातील वेकोलि परिसरात धुराचे साम्राज्य आहे. सास्ती, गोवारी, पवनी परिसरात रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे नागरिक आणि वेकोलि कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वेकोलि परिसरात चालत्या गाडीमध्ये कोळसा जळत आहे.

अरुंद रस्त्यांमुळे अपघाताचा धोका

नांदा : नांदा गावालगत सिमेंट उद्योग असल्याने मागील काही वर्षांमध्ये लोकसंख्या व वाहने वाढली. या परिसरात रस्ते अरुंद असल्याने अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात.

विदर्भ नदीच्या पाणी पातळीत घट

कोरपना : यवतमाळ जिल्ह्यातील घोन्सा परिसरातील कोळसा खाणीमुळे विदर्भ नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात या प्रवाहात पाण्याचे दुर्भिक्ष्य उद्भवण्याची चिन्हे आहे.

कोंडवाड्यांतील जनावरे असुरक्षित

कोरपना : मोकाट जनावरांना ठेवण्यासाठी गावागावात कोंडवाडे बांधले आहेत. मात्र सद्यस्थितीत या कोंडवाड्यांची अवस्था बिकट आहे. जिल्हा परिषदेने यासाठी निधी देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पाण्याची पातळी खालावली

राजुरा : तालुक्यातील गोवरी परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने नाले कोरडे पडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. नदी, नाले कोरडे पडायला लागल्याने शेतीला पाणी देणे कठीण झाल्याने चिंता वाढली आहे.

ढिगाऱ्यांमुळे वन्यप्राण्यांचे वास्तव

गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलीने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यावर मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांचा याठिकाणी वावर वाढला आहे. त्यामुळे हे मातीचे ढिगारे धोकादायक ठरत आहे.

जुन्या वाहनांना कालबाह्य करावे

घुग्घुस : शहरात कोळसा खाणी तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा

भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यामुळे याचे दुपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. कोरोनामुळे सध्या रस्त्यावर कमी वाहतूक आहे.

गावांना रस्त्याची प्रतीक्षा

वरोरा : तालुक्यातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागते. अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. अनेकदा रस्ते तयार करण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र याचा फटका नागरिकांना बसत आहे.

बल्लारपूर-सिरोंचा रेल्वेमार्ग तयार करा

बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे. हा मार्ग तयार झाल्यास बल्लारपूर, गोंडपिपरी, आष्टी, आलापल्ली, अहेरी, सिरोंचा भागातील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.

गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता

गडचांदूर : गडचांदूर रेल्वे क्रासिंग ते अल्ट्राटेक चौकापर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले. मात्र गतिरोधक नसल्याने हा महामार्ग धोकादायक ठरत आहे. या महामार्गावर असलेल्या राजीव गांधी चौक (पेट्रोल पंप) संविधान चौक (बसस्थानक) व वीर बाबुराव शेडमाके चौक गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट वेगाने जात आहे. यामध्ये अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांना याच दिशेने जावे लागते. त्यामुळे पोलीस व बांधकाम विभागाने समस्येकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. मागील काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे.

Web Title: Without music water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.