सुरक्षा साहित्याविना कोळसा खाणीतील कामगारांचे कामच धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 02:22 PM2024-10-19T14:22:48+5:302024-10-19T14:24:44+5:30
जिवाला धोका : केपीसीएल कंपनीचे कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : तालुक्यातील कर्नाटक एम्टा, केपीसीएल खुल्या कोळसा खाणीतील कामगारांनी आपल्या सुरक्षा साहित्यासह काही इतर मागण्या घेऊन ४ ऑक्टोबर रोजी कंपनीचे काम बंद पाडून आंदोलन केले. यावर कंपनीने ८ ऑक्टोबरला जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात तोडगा काढू, असे म्हणून आंदोलन दडपले. मात्र, अजूनही कामगारांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यांना सुरक्षा साहित्याविनाच काम करावे लागत आहे.
यामुळे केपीसीएल कामगारांमधून संताप व्यक्त केला जात असून, ते आता सुरक्षा साहित्य खरेदी करण्यासाठी भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन कामगारांनी उपमहानिर्देशक डीजीएमएस कार्यालय, नागपूर यांना दिले आहे.
केपीसीएल कंपनीचे २०२० पासून कोळसा उत्खनन पुन्हा चालू झाले आहे. कंपनीमध्ये स्थायी कामगार २००, कंत्राटी ४०० कामगार कार्यरत आहेत कोळसा उत्खननाचे कार्य करत असताना कामगारांना नियमानुसार सुरक्षा साहित्य जसे हेल्मेट, सेफ्टी शूज, रिफ्लेक्टर जॅकेटसह इतर साहित्य दिले जाते. ते आवश्यकही आहे. मात्र, कंपनीने चार वर्षांपासून या कामगारांना सुरक्षा साहित्य दिलेच नाही. हे कामगार जीव मुठीत घेऊन कोळसा उत्खननाचे काम करत आहेत. यामुळे त्यांच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. असा प्रकार कोळसा खाण क्षेत्रात पहिल्यांदाच केला जात आहे. साधे कामगारांना सुरक्षा उपकरण पुरवले जात नाही तर कामगारांच्या इतर मागण्यांचे काय होत असेल, हे कळून येते.
११ दिवसात मागण्या मान्य करा, अन्यथा भीक मागून घेणार साहित्य
२२ दिवसात केपीसीएल कंपनीने कामगारांच्या मागण्या मान्य करत सुरक्षा साहित्य पुरवले नाही तर भद्रावती परिसरात भीक माँगो आंदोलन करणार असल्याचे निवेदन उपमहानिर्देशक डीजेएमएस नागपूर यांना अरविंद देवगडे यांनी २०० कामगारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पाठवले आहे.