बिरसा मुंडा यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष
By admin | Published: June 13, 2016 02:34 AM2016-06-13T02:34:42+5:302016-06-13T02:34:42+5:30
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला.
सुनील येरमे यांचे प्रतिपादन : बाबुपेठ येथे बिरसा मुंडा जयंती कार्यक्रम
चंद्रपूर : बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी बिहार राज्यातील रांची जिल्ह्यातील उन्नीहातू येथे झाला. त्यांनी अवघे २५ वर्षे वय असताना इंग्रजांविरोधात बंड पुकारून त्यांना सळो की पळो करून सोडले. ब्रिटिशांविरोधात क्रांती पेटविण्याचे काम बिरसा यांनी केले. १८९० मध्ये बिरसा यांच्या नेतृत्वाखाली एक सशस्त्र संघटना उभी करून क्रांतीचा वणवा बिहारभर पसरविला. त्यामुळे ब्रिटिशांना तेथे काम करणे अडचणीचे झाले होते, त्यांच्या पराक्रमाला इतिहास साक्ष आहे, असे प्रतिपादन भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील येरमे यांनी केले.
बाबुपेठ येथे गुरूवारी आयोजित बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, बिरसांनी एका जाहीर सभेत कुऱ्हाडीने आपला हात कापला आणि आपल्या रक्तानी उपस्थिती आदिवासींच्या कपाळावर टिळा लावून आपल्या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार, महिलावरील अत्याचाराचा बीमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे वचन दिले. तरुण वयातच बिरसामध्ये असलेल्या धाडसाला इतिहास साक्ष आहे, असे ते म्हणाले.
तंट्याभिल्ल आदिवासी महिला बहुउद्देशीय संस्था बाबूपेठच्या वतीने गुरुवारी बिरसा मुंडा चौक बाबूपेठ येथे बिरसा मुंडा शहीद दिन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश गेडाम यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून एकनाथ कन्नाके, तुळसीदास ताडाम, दयालाल कन्नाके, डॉ. देव कन्नाके, अशोक आक्केवार आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात रांची येथून बिरसा यांच्या समाधीवरील आणलेल्या मातीवर वृक्षारोेपण करण्यात आले. या स्थळाला श्रद्धास्थान संबोधण्यात आले. प्रास्ताविक अशोक आक्केवार तर आभार गणेश सिडाम यांनी मानले. यशस्वीतेसाठी लता पोरटे, संतोेष सिडाम, नर्मदा सिडाम, गीता मडावी, माणिक आत्राम, सिडाम आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)