अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेला पोलीस बंदोबस्तात नेले उपचारासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 01:41 PM2019-07-11T13:41:39+5:302019-07-11T13:45:06+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अंधश्रद्धेपोटी प्रकृती खालावलेल्या एका प्रसूत महिलेला उपचारासाठी नेण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला. अखेर पोलीस बंदोबस्तात जावून वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले.
संघरक्षित तावाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अंधश्रद्धेपोटी प्रकृती खालावलेल्या एका प्रसूत महिलेला उपचारासाठी नेण्यास गावकऱ्यांनी मज्जाव केला. अखेर पोलीस बंदोबस्तात जावून वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या महिलेचे गाव गाठले. गावकऱ्यांचा विरोध झुगारून त्या महिलेला उपचारासाठी आरोग्य केंद्रात नेले. दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात अजूनही नागरिक पारंपरिक उपचाराला महत्त्व देत असून त्यापोटी अंधश्रद्धेत वावरत असल्याचा प्रत्यय नोकेवाडा येथे बुधवारी या घटनेवरून आला.
आदिवासी कोलाम बांधवांची सुमारे ५० घरे असलेचे नोकेवाडा हे गाव जिवतीवरून १६ किमीवर आहे. नोकेवाडा या गावात मासिक पाळी व प्रसूतीनंतर महिलेला गावाबाहेर ठेवले जाते. २६ जून रोजी गावातीलच २० वर्षीय अय्युबाई बालू मडावी या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. अंधश्रद्धेपोटी गावकऱ्यांनी तिलाही घराबाहेर ठवले. अशात अय्युबाईची प्रकृती बिघडत असताना तिच्यावर गावगाड्यातले उपचार करणे सुरू होते. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी ती ढासळतच गेली. ही बाब अंगणवाडी व आरोग्यसेविकेला माहिती होताच त्यांनी तिला उपचाराची अत्यंत गरज असल्याचे सांगून रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र गावकऱ्यांनी तिचा सल्ला धूडकावून लावला. वारंवार विनवण्या करूनही गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तिच्या प्रकृतीची चिंता वाटू लागली. पंधरा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या मातेचा जीव धोक्यात असल्याचे पाहुन ही बाब जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी सुरेश बागडे यांनी सांगितली. त्यांनी तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत अवगत केले. अखेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.पी. अनकाडे यांनी पोलीस बंदोबस्तात रुग्णवाहिकेसह आपल्या टिमला घेऊन नोकेवाडा गाव गाठले. गावकऱ्यांचा विरोध झुगारून त्या मातेला उपचारासाठी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन लगेच तिच्यावर उपचार सुरू केले. त्या महिलेची तिथेच आरोग्य तपासणी केली असता तिच्या शरीरात केवळ २.९ हिमोग्लोबीन होते. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.पी. अनकाडे यांनी सांगितले. यानंतर सदर महिलेला चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रसूतीनंतर महिलेला दवाखान्यात उपचार घेण्यासाठी सांगितले, पण आम्ही नेणार नाही. ती देवाच्या कृपेने बारी होईल असेच म्हणायचे, त्यानंतर याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितले
- एस. एन. दुर्गे, आरोग्यसेविका
सकाळी गावात जाऊन विनवणी केली की सदर मातेला उपचार घेण्यास पाठवा. पण येथील लोक मानायला तयार नव्हते. आमच्या रूढी, परंपरेचा तुम्ही अपमान करत आहात असे बोलायला लागले. तेव्हा लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून पोलीस बंदोबस्त घेऊन येण्यास सांगितले.
- सुरेश बागडे, सं.वि.अधिकारी, जिवती.