दुचाकीला वाचविताना भरधाव कार उलटली; एका महिलेचा जागीच मृत्यू,चाैघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 10:44 AM2022-04-14T10:44:37+5:302022-04-14T10:47:27+5:30
दुचाकीला वाचविताना कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटली.
वरोरा (चंद्रपूर) : नागपूर-चंद्रपूर मार्गावरील नंदोरी गावानजीक ट्रकने दुचाकीला कट मारला. दुचाकी एकदम भरधाव कारसमोर आली. दुचाकीला वाचविताना कार रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात कारमधील एक महिला जागीच ठार तर पाच व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली.
एमएच ३५ पीओ ६१७ या स्वीफ्ट कारने यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून वरोरामार्गे भद्रावती येथील कार्यक्रमाकरिता सहा जण गेले होते. भद्रावतीवरून परत येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रकने एका दुचाकी वाहनाला कट मारला. त्यामुळे दुचाकी अचानक कारच्या समोर आली. दुचाकीला वाचविताना कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला पलटली.
कारमधील चंद्रकला सुधाकर गौरकार (४५, रा. वरझडी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनिरुद्ध महादेव तपासे (३५, रा. आनंदनगर वणी), महादेव रामराव तपासे (५५), मनिषा गोकुलदास रोगे (२६), सावी मनोज रोगे (४), सविता रमेश होरडे (४५) हे गंभीररीत्या जखमी झाले. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचा तपास वरोरा पोलीस करीत आहेत.