बापरे... दारासमोरच दोन पिलांसह अस्वल; ...अन् अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 12:28 PM2021-12-12T12:28:30+5:302021-12-12T12:33:52+5:30
एक महिला सकाळी उठून घरची कामे करण्यासाठी अंगणात जाण्यासाठी दार उघडताच तिला दारात चक्क दोन पिलांसह अस्वल दिसले. त्या महिलेने तेवढ्याच समयसुचकतेने लगेच घराचे दार बंद करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
चंद्रपूर : हिंस्र पशूंसोबत सामना झाला तर काय होते. याची कल्पना न केलेलीच बरी; परंतु एक महिला सकाळी उठून घरची कामे करण्यासाठी अंगणात जाण्यासाठी दार उघडताच तिला दारात चक्क दोन पिलांसह अस्वल दिसले. ध्यानीमनी नसताना घडलेल्या या घटनेने ती महिला पुरती हादरली. तरीही त्या महिलेने तेवढ्याच समयसुचकतेने लगेच घराचे दार बंद करून घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
ही घटना नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील वाढोणा येथील रामटेकडी येथे शनिवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. विनायक येसनसुरे यांची स्नुषा शितल प्रफुल्ल येसनसुरे यांच्यासाेबत हा अनपेक्षित प्रसंग घडला. ही महिला पहाटे उठल्यानंतर घरातील कामे आटोपत होती. यानंतर त्या महिलेने अंगणात जाण्यासाठी घराचे दार द्वार उघडले. बघते तर काय पुढे चक्क दोन लहान पिलांसह अस्वल उभी आहे. आता काय करावे काही सूचेनासे झाले. तरीही मोठ्या हिमतीने त्या महिलेने घराचे दार परत बंद करून आरडाओरड सुरू केली.
यानंतर गावकऱ्यांना आवाजाच्या दिशेने धाव घेतली. अस्वलही आपल्या पिलांना घेऊन लगतच्या टेकळीच्या खालील भागातील मंगेश राऊत यांच्या घरासमोरील झुडपात गेली. तेथून नाट्यलेखक रूपचंद निकुरे यांच्या शेतात काही वेळ थांबल्यानंतर मोठ्या नाल्याच्या दिशेने निघून गेली. दरम्यान, वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या अस्वलाला पिटाळून लावले. ती गायमुख - सावंगी जंगलात वळविल्याची माहिती आहे.
वन्यप्राणी थेट गावात, शेतात येऊ लागल्याने वाढोणा-सावरगाववासीयांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण आहे. या परिसरात नव्यानेच आढळून आलेल्या अस्वलाचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. ही अस्वल सोनापूर (तुकूम) डोंगरी परिसरातून आली असल्याचा नागरिकांचा अंदाज आहे.
नेहमीच वाघ व वन्यजीवांचे दर्शन
वाढोणा या मार्गांवरून बोकडी नदी वाहत असते. नदीकिनारी व समोरील एका मोठ्या नाल्या सभोवताल सावरगाव व वाढोणा येथील अनेक शेतकऱ्यांचे शेत आहेत. शेतात नेहमी रात्री- बेरात्री शेतकऱ्यांना जावे लागते. अशा वेळी नेहमीच येथे वाघ व अन्य वन्यप्राण्यांची ये- जा सुरू असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.