बिबट्याने घराच्या अंगणात येऊन केले महिलेला ठार; दुर्गापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2022 06:21 PM2022-05-02T18:21:25+5:302022-05-02T18:31:01+5:30
काही कळायच्या आत बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला.
दुर्गापूर (चंद्रपूर) : दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ येथील गीताबाई मेश्राम (४७) या महिलेवर तिच्या घराच्या अंगणात येऊन बिबट्याने हल्ला केला. यात तिचा जागीच मृत्यूू झाला. ही घटना रविवारी रात्री ११:३० वाजताच्या सुमारास घडली.
दुर्गापूर परिसरात बिबट आणि वाघाच्या हल्ल्याच्या घटना खूपच वाढल्या आहेत. दुर्गापूर वार्ड क्रमांक ३ येथे वास्तव्यास असलेल्या गीताबाई मेश्राम अंगणात उभ्या होत्या. परिसरातच एक बिबट्या दबा धरुन बसलेला होता. काही कळायच्या आत बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविला. मानेचा घोट घेत त्यांना जागीच ठार केले. नंतर हा बिबट्या त्यांना फरफटत घेऊन जात होता. तेवढ्यात त्यांचा मुलगा बाहेर आला. जोरजोरात आरडाओरड केल्याने मृतदेह टाकून बिबट्याने पळ काढला.
जिल्ह्यात वाघ-बिबट हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. २८ एप्रिललादेखील वाघाने घरात घुसून महिलेला ठार केल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील घटना गुंजेवाही परिसरातील चीकमारा गावात घडली होती.
मुख्य वनसंरक्षकाच्या कार्यालयापुढे ठेवला मृतदेह
दुर्गापूर परिसरात वाघ आणि बिबट्याचे अनेक महिन्यांपासून वास्तव्य आहे. याबाबत अनेकदा नागरिकांनी ओरड केली. मात्र वनविभागाने लक्ष दिले नाही. आता हे हिंस्र प्राणी माणसाचे बळी घेत आहेत. त्यामुळे संतप्त नागरिकांनी चंद्रपूर वनवृत्ताच्या मुख्य वनसंरक्षक कार्यालयापुढे गीताबाई यांचा मृतदेह ठेवून आपला संताप व्यक्त केला. बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली. यामुळे तिथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दुर्गापूर ठाण्याचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथक व पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. अखेर वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला.