वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 01:52 PM2024-11-30T13:52:12+5:302024-11-30T13:53:42+5:30

Chandrapur : कुटुंबास तात्काळ २५ हजार रुपयांची मदत जाहीर

Woman killed in tiger attack; Incident in the Savali forest area of Chandrapur district | वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रातील घटना

Woman killed in tiger attack; Incident in the Savali forest area of Chandrapur district

चंद्रपूर : जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्रातील सामदा बुज. वनबीटातील निलंसनी पेठगाव येथिल रहिवासी रेखाबाई मारोती येरामलवार (५५) या महिलेला वाघाने ठार केले. ही घटना शनिवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. त्यामुळे गावात व परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या घटनेसंदर्भांत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, रेखाबाई मारोती येरमलवार ही महिला दि. २९ नोव्हेंबर रोजी झाडण्या कापण्यासाठी निलंसनी पेठगाव ला लागुन असलेल्या वैनगंगा नदीकाठावरील जंगलात गेली होती. नदीला लागुन असलेल्या नाल्याजवळ झाडण्या कापत असताना दबा धरून असलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला केला. यात रेखाबाई जागीच ठार झाली. ती सायंकाळ झाली तरी घरी आली नाही म्हणून मुलगा महादेव येरमलवार, राकेश येरमलवार व गावकऱ्यांनी रात्री शोध घेतला. परंतु ती मिळाली नाही . 

घटनेची माहिती वनविभागास त्याच रात्र मिळाल्याने सामदा बिटाचे वनरक्षक यांचे स्थानिक पीआरटीचे कार्यकर्ते आकाश चुदरी, छगन बोरकुटे, प्रफुल्ल गेडाम, इंदारशाह पेंदाम, मंगेश कांबळे यांनी वनविभागाच्या सूचनेनुसार गावांशेजारी गस्त घातली. दरम्यान रात्रीच्या सुमारास तो वाघ गावातील जिल्हा परिषद शाळेला लागुन असलेल्या बालाजी कात्तलवार यांचे घराशेजारी आल्याचे दिसल्याने पीआरटीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून त्यास हाकलून लावले. आज सकाळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर , वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे , क्षेत्र सहाय्यक आर. एम. सूर्यवंशी, बिट वनरक्षक बी. के. सोनेकर, आर. एस. डांगे आणि गावकऱ्यांनी शोध घेतला असता रेखाबाई ही मृत अवस्थेत वैनगंगा नदीकाठावरील जंगलात आढळून आली. मृत महिलेचे प्रेत वनविभागाने पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले आणि कुटुंबास तात्काळ २५ हजार रुपयांची मदत दिली.  अशाच प्रकारची घटना ६ डिसेंबर २०२२ रोजी येथे घडली होती. यात कैलास गेडेकर या इसमास जंगलात जळाऊ काळ्या आणण्यासाठी गेला असता वाघाने ठार मारले होते.  त्यामुळे या घटनेने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निलंसनी पेठगाव हे नदीकाठावर असल्याने या परिसरात नेहमीच वाघाचा संचार असतो त्यामुळे वनविभागाने गावाबाहेर सौर ऊर्जेचे दिवे लावावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Woman killed in tiger attack; Incident in the Savali forest area of Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.