महिलेने ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप
By admin | Published: July 12, 2015 01:12 AM2015-07-12T01:12:54+5:302015-07-12T01:12:54+5:30
तालुक्यातील मालडोंगरी ग्रामपंचायतीला एका महिलेने अतिक्रमणाच्या जागेवर टॅक्स लावण्यासाठी सरपंचांना चिरीमिरी देऊनही काम न झाल्याने चक्क ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले.
सरपंचांनी तोडले : टॅक्स लावण्यासाठी महिलेची पायपीट
ब्रह्मपुरी : तालुक्यातील मालडोंगरी ग्रामपंचायतीला एका महिलेने अतिक्रमणाच्या जागेवर टॅक्स लावण्यासाठी सरपंचांना चिरीमिरी देऊनही काम न झाल्याने चक्क ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. सरपंचांनी ते कुलूप तोडल्याने ग्रामसेवक व कर्मचारी यांनी सुटकेचा नि: श्वास सोडला असला तरी हा सर्व प्रकार गावकऱ्यांसाठी विचार करायला भाग पाडणारा ठरला आहे.
आज शनिवारी सकाळी गावातील एका महिलेने १० वाजताच्या सुमारास घरून कुलूप आणून सरपंचांच्या विरोधात मोठमोठ्याने ओरडून ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले. संपूर्ण दिवसभर ग्रामपंचायत बंद होती. ग्रामसेवक व कर्मचारी दिवसभर ताटकळत बाहेर होते. सदर महिलेने अतिक्रमाणाच्या जागेवर टॅक्स सुरू करण्याविषयी सरपंचाला चिरीमिरी दिली होती. परंतु अजूनही टॅक्स लावला न गेल्याने ती संतप्त झाली व रागाच्या भरात तिने ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले. सरपंचांनी टॅक्स लावण्यासाठी चिरीमिरी घेतल्याचा मोठमोठ्याने आरोप करीत होती व हे प्रत्यक्षदर्शी गावकरी ऐकत होते. सरपंच गावात नसल्याने ते सायंकाळी आले असता त्यांनी हा प्रकार पाहून स्वत:च कुलूप तोडले. गावकरी अचंबित होऊन हा सर्व प्रकार पाहत होते.
सदर घटनेची रितसर तक्रार कोणीही केली नसल्यामुळे महिलेची भूमिका योग्य असल्याचे बोलले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य सचिन ठेंगरी यांनी या घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे संवर्ग विकास अधिकाऱ्यांना दिली. हा प्रकार काय वळण घेते, याकडे गावकऱ्यांचे लक्ष आहे. (प्रतिनिधी)