अन् झुडुपातून निघत अचानक बिबट्या आला अंगावर; महिला गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 11:38 AM2023-03-10T11:38:25+5:302023-03-10T11:39:58+5:30
चंद्रपूर तालुक्यातील वायगाव येथील घटना
चंद्रपूर : जंगलव्याप्त वायगाव येथील एक महिला सकाळच्या सुमारास घरापासून काही अंतरावर काम करीत असताना अचानक जवळच असलेल्या एका झुडुपातून बिबट्याने महिलेवर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला जिवाच्या आकांताने किंचाळली. लगेच गावकरी धावत आले. त्यामुळे बिबट्याने पळ काढला. ही घटना गुरुवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मामला-बोर्डा वनपरिक्षेत्रात वायगावजवळ घडली.
सरूबाई करपते (६५, रा. वायगाव) असे या महिलेचे नाव असून ती यात गंभीर जखमी झाली आहे. वायगाव हे गाव जंगलाला लागून असल्याने मागील अनेक दिवसांपासून वन्यप्राण्यांचा गावालगत वावर वाढला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी वारंवार करण्यात येऊनही वनविभागाने याकडे लक्ष दिले नाही. अशातच गावाजवळच बिबट्याने सरूबाईवर हल्ला चढवीत गंभीर जखमी केल्याची घटना घडताच गावकरी चांगलेच संतापले.
घटनेची माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचताच पुन्हा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यामुळे वनाधिकाऱ्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले. चंद्रपूर येथील रामनगर पोलिसांचे पथक लगेच घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनास्थळी चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर व वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत लगेच सरूबाई करपते यांना चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची तातडीची मदत दिली.