वाघाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातील चेक हत्तीबोडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 05:49 PM2021-11-15T17:49:41+5:302021-11-15T17:57:40+5:30
शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज १२:३० च्या सुमारास घडली.
चंद्रपूर : चेक हत्तीबोडी येथील भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. कांताबाई रामदास चलाख (६०) असे जखमी महिलेचे नाव असून, ती मूल तालुक्यातील सिंथळा येथील रहिवासी आहे.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या चेक हत्तीबोडी शिवारात बोर्डा बोरकर येथील देवेंद्र कुनघाडकर यांचे शेत असून, शेतात धान कापणीचे काम सुरू होते. भाऊबीजेसाठी आलेली बहीण आपल्या भावाच्या शेतात धान कापणीचे काम पाहणीसाठी गेली. दरम्यान, शेतातील पाळीवर दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कांताबाईवर हल्ला चढवून गंभीर जखमी केले.
आरडाओरड केल्याने शेतात काम करीत असलेल्या मजुराने वाघाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर वाघ जंगलाच्या दिशेने निघून गेला. या हल्ल्यात कांताबाई ही गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्र पोंभूर्णा येथे दाखल करून उपचार करण्यात आले.