कपर्ला ग्रा.पं.च्या महिला उपसरपंच व पतीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:29 AM2021-02-16T04:29:52+5:302021-02-16T04:29:52+5:30
भिसी : येथून पाच किमी अंतरावरील कपर्ला येथील महिला उपसरपंच निर्मला वाघमारे व तिच्या पतीला काठ्यांनी ...
भिसी : येथून पाच किमी अंतरावरील कपर्ला येथील महिला उपसरपंच निर्मला वाघमारे व तिच्या पतीला काठ्यांनी मारहाण करण्यात आल्याची तक्रार निर्मला वाघमारे यांनी भिसी पोलिसात दाखल केली. त्यानुसार, भिसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपर्ला ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक ८ फेब्रुवारी रोजी पार पडली. सदर निवडणुकीत दडमल गटाकडून निवडून आलेल्या निर्मला वाघमारे या महिला ग्रामपंचायत सदस्याने सरपंचपदाच्या निवडणुकीत आपला गट सोडून विरोधी खेडकर गटाला मदत केली व स्वतः उपसरपंचपद मिळविले. याचा राग मनात धरून निर्मला वाघमारे यांना व त्यांच्या पतीला १५ फेब्रुवारीला दुपारी मारहाण करण्यात आली, अशी माहिती ग्रामस्थांकडून प्राप्त झाली.
८ फेब्रुवारीला गावात चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अनर्थ टळला, परंतु रविवारी मधुकर दडमल, भास्कर दडमल हे दोघे उपसरपंच निर्मला वाघमारे यांच्या घरी पैसे मागण्यासाठी गेले असता, शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, निर्मला वाघमारे व तिच्या पतीला आरोपींनी काठीने डोक्यावर मारहाण केली, अशी माहिती भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज गभने यांनी दिली.
आरोपींविरुद्ध कलम ३२४, ४८८ , ४५२ , ३४ , ५०४ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार मनोज गभने यांच्या मार्गदर्शनात जमादार भास्कर आत्राम पुढील तपास करीत आहेत.