बसमध्ये प्रवासी महिलेचा सव्वा लाखाचा ऐवज लांबविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:35 AM2021-09-16T04:35:39+5:302021-09-16T04:35:39+5:30
नागभीड : बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपयाचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी नागभीड येथे घडली. ...
नागभीड : बसमध्ये चढत असताना महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्यांनी सव्वा लाख रुपयाचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी नागभीड येथे घडली. या घटनेने येथे चांगलीच खळबळ माजली आहे.
येथील योगिता जितेंद्र समर्थ (३२) या घुग्घुस येथे नातेवाईकाच्या घरी वास्तूपूजनाला जाण्यासाठी दुपारी २ च्या सुमारास नागभीड बसस्थानकावर आल्या. यावेळी बसस्थानकावर चांगलीच गर्दी होती. बऱ्याच प्रतीक्षेनंतर बसस्थानकात आल्यानंतर त्या घाईघाईने बसमध्ये चढायला लागल्या. ही संधी साधून चोरट्याने त्यांच्या हातातील पर्समधील सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. त्यांचे लक्ष गेले असता पर्सची चेन खुली दिसताच ही बाब उघडकीस आली. या प्रकाराने त्यांना चांगलाच धक्का बसला व घुग्घुसला जाण्याचा बेत रद्द केला. या धक्क्यातून सावरत त्या घरी आल्या. कदाचित दागिने घरी विसरले असतील म्हणून घरी चौकशी केली. पण दागिने घरीही नव्हते. लागलीच कुटुंबीयांनी पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची तक्रार नोंदवली. चोरी गेलेल्या ऐवजात सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन व नगदी १७०० रू असा एकूण १ लाख २६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता.
फिर्यादीवरून नागभीड पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बारसागडे करत आहेत.