अंत्यसंस्कारास मनाई केल्याने घरी परत नेला महिलेचा मृतदेह; नवेगावातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 10:42 AM2023-09-09T10:42:44+5:302023-09-09T10:48:49+5:30

स्मशानभूमीचा वाद सोडविण्यासाठी तहसीलदार गावात

Woman's body takes back to home after raised oppose for cremation in cemetery; sensational incident in Navegaon | अंत्यसंस्कारास मनाई केल्याने घरी परत नेला महिलेचा मृतदेह; नवेगावातील खळबळजनक घटना

अंत्यसंस्कारास मनाई केल्याने घरी परत नेला महिलेचा मृतदेह; नवेगावातील खळबळजनक घटना

googlenewsNext

सतिष जमदाडे

आवाळपूर (चंद्रपूर) : गाव कोरपना तालुक्यात तर ग्रामपंचायत राजुरा तालुक्यातील वरोडा अंतर्गत येत असलेल्या नवेगाव येथे स्मशानभूमीचा वाद सुरू आहे. या वादातून अंत्यसंस्कारास मनाई केल्याने वृद्ध महिलेचा मृतदेह घरी परत नेण्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. ८) घडली. हा वाद सोडविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तहसीलदार व पोलिस गावात होते. मात्र, काहीही तोडगा निघाला नाही.

नवेगाव येथील सरस्वती लक्ष्मण कातकर (८५) या वृद्ध महिलेचा गुरूवारी मृत्यू झाला. गावाला स्मशानभूमीची जागा नाही. त्यामुळे मृत महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाबाहेर नेण्यात आले. मात्र, त्या जागेवर शेतकऱ्यांनी मनाई केली. त्यामुळे मृतदेह बराच वेळ रस्त्यावर ठेवण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले. वाद वाढण्याची शक्यता दिसल्याने पोलिसांनाही पाचारण्यात आले. दरम्यान, तहसीलदार प्रकाश व्हटकर घटनास्थळावर दाखल झाले. स्मशानभूमीची जागाच मिळत नसल्याचे पाहून गावकऱ्यांनी महिलेचा मृतदेह पुन्हा गावात नेला. त्यानंतर वाद उफाळला. शुक्रवारी रात्री वृत्त लिहेपर्यंत परिस्थिती जैसे थे होती.

नेमके काय घडले ?

नवेगाव येथे स्मशानभूमी नसल्याने नागरिकांनी कोरपना तहसीलदारांकडे मागितली असता सर्व्हे क्र २१ खाते क्र. ५०१ मधील ४० आर. जागा देण्यात आली. त्याचा सातबारा ही आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या जागेवर महादेव गोरे व इतरांनी अतिक्रमण केले. नायब तहसीलदारांनी २६ मे २०२३ रोजी अतिक्रमण काढण्याचा आदेश जारी केला. परंतु अतिक्रमण हटले नाही. ८ जून २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने कोरपना तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले. ग्रामपंचायत वरोडा अंतर्गत नवेगाव येथील गायरान सर्व्हे नं.२१ वरील २१/१ अतिक्रमित जागेची चौकशी करून अहवाल सादर करायचा होता. पण, यावरही कार्यवाही झाली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे.

अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह नेले असता अतिक्रमण धारकाने वाद घातल्याच्या घटना यापूर्वी पाचदा घडल्या आहेत. पण, प्रशासनाने स्मशानभूमीची जागा काढून दिली नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी शुक्रवारी मृत झालेल्या वृद्ध महिलेचे प्रेत घरी नेले. जोपर्यंत हक्काची स्मशानभूमी मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार नाही, यावर कुटुंब व गावकरी ठाम आहेत.

- वनमाला सिद्धार्थ कातकर, सरपंच, वरोडा

शासनाने त्या जागेचा पट्टा संबंधित व्यक्तीला दिला. मात्र गावकऱ्यांच्या मागणीनुसार व शासनाच्या नियमाप्रमाणे ही जागा खारीज करून कायमस्वरूपी स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात येईल. मृत महिलेचा अंत्यसंस्कार करावा, यासाठी गावकऱ्यांची समजून काढणे सुरू आहे.

- प्रकाश व्हटकर, तहसीलदार, कोरपना

Web Title: Woman's body takes back to home after raised oppose for cremation in cemetery; sensational incident in Navegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.